नवी दिल्ली – भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली आहे. उत्तराखंडमध्ये यात्रा करत असताना त्यांना कोरोना झाला. उमा भारती यांनी ट्वीट करुन कोरोना झाल्याची तसेच स्वतःला उत्तराखंडमध्येच क्वारंटाइन करुन घेतले असल्याची माहिती दिली. तसेच उमा भारती यांनी मागील दोन आठवड्यात त्यांच्या संपर्कात आलेल्यांना स्वतःची कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.
मागील दोन तीन दिवसांपासून ताप येत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उमा भारती यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचा निर्णय घेतला. ही चाचणी पॉझिटिव्ह येताच त्यांनी क्वारंटाइन होऊन वैद्यकीय उपचार घेण्याचा निर्णय घेतला.
सध्या उमा भारती उत्तराखंडमधील वंदे मातरम कुंजमध्ये आहेत. हे ठिकाण हरिद्वार आणि ऋषिकेश या दोन तीर्थस्थळांच्या मधल्या परिसरात आहे. कोरोना झाल्याचे लक्षात येताच उमा भारती यांनी तिथेच एका खोलीत स्वतःला क्वारंटाइन करुन घेतले आहे. स्थानिक प्रशासनाने त्यांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा दिल्या आहेत.
ज्या ठिकाणी उमा भारती क्वारंटाइन होऊन वैद्यकीय उपचार घेत आहेत त्या ठिकाणापासून जवळच ऋषिकेश एम्स आहे. उमा भारती यांनी स्वतःच वेळोवेळी ट्वीट करुन त्यांच्या वैद्यकीय स्थितीची माहिती देणार असल्याचे सांगितले.







