मुंबई (हितेश मिस्त्री) – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. आता ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. मागील आठवड्यात त्यांनी राज्यातील विद्यापीठांना भेटी दिल्या आहेत.
ते गेले १० दिवस क्वारंटाईन आहेत. उदय सामंत यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. ते येत्या आठवडाभरात बरे होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करुन दिली आहे.
गेले दहा दिवस स्वतः विलगिकरणात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले १० दिवसांत कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे.. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मागील आठवड्यात ठाकरे सरकारमधील मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे एक स्वीय सहाय्यक कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी आपल्यालाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण झाली होती.







