नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – राज्यातील तत्कालीन ‘भाजप-सेना सरकार’ने राज्यातील दिव्यांगांसाठी शाळा सुरु करण्यासंदर्भात मंजूर केलेल्या कायद्याला तब्बल दोन वर्षे उलटली तरी त्याची अंमलबजावणी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून केली जात नसल्याचे सांगत ‘बेलापूर’च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महापालिकेच्या ईटीसी केंद्रात गैरव्यवहार सुरु असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दिव्यांगांसाठी शाळा सुरु करण्याबाबत मंजूर कायद्याची अंमलबजावणी करण्यास चालढकल केल्यास प्रसंगी महापालिका आयुक्तांविरुध्द राज्य विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात हक्कभंग ठराव आणण्याचा निर्धारही आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी 29 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत बोलून दाखविला.
दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री तथा विधानसभाचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कायदा करुन राज्यातील दिव्यांगांना आणि त्यांच्या पालकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आता विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सदर कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होण्यासाठी अधिनस्त संबंधित अधिकाऱयांना निर्देश देऊन समस्त दिव्यांग मुलांना आणि त्यांच्या पालकांना न्याय देतील, अशी अपेक्षा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केली.







