- एसटी महामंडळालाच माहिती नाही कोणी बनवली जाहिरात
- झटपट होतेय व्हायरल ही जाहिरात
जळगाव (संपादक सुनिल पाटील) – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एक जाहिरात गेल्या तीन दिवसांपासून सोशल मिडीयावर झटपट व्हायरल होत आहे. अगदी व्यवसायिक वाटावी अशी ही जाहिरात अनेकांना गुंतवून ठेवते आहे. मात्र ती केली कोणी? हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
कोरोनामुळे `एसटी`ला देखील जाहिरातीची गरज वाटू लागली का? याचे उत्तर माहित नाही. मात्र कोणीतरी अशी अशी व्हीडीओसह सुंदर चाल दिलेल्या गाण्यातून जाहिरात केल्याचे पुढे येत आहे. या जाहिरातीत सहभागी महिला बस्थानकावर `एसटी`चे कौतुक गीत गात एकमेकींना बसने प्रवास करण्याचा आग्रह करीत आहे. जाहिरातीत `एसटी`चे विविध गुण, वैशिष्ठ्ये सांगत या महिला मास्क घालून `एसटी`च्या साध्या लाल बसने प्रवासाला निघाल्या आहेत. ही जाहिरात लोकांना आकर्षित करत असून, जाहिरातीच्या शेवटी परिवहन मंत्री अनिल परब आणि `एसटी`चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे छायाचित्र आहे.
`प्रवाश्यांच्या सेवेसाठी, एसटी` हे ब्रीद घेऊन गेली बहात्तर वर्षे अविरत प्रवाश्यांच्या सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने कधी जाहिरात केलेली नाही. देश स्वतंत्र झाल्यावर लगेचच १९४८ मध्ये महाराष्ट्र परिवहगन महामंडळाची स्थापना झाली. आणि हळू हळू गाव तीथे एसटी बस असे समीकरण झाले. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे गेले सहा महिने महामंडळाने सेवा बंद ठेवली. त्यामुळे महामंडळापुढे आर्थिक व अन्य अडचणी उभ्या राहिल्या. कर्मचारी अडचणीत आहेत.
सध्या काही मोजक्या मार्गावर बसेस धाऊ लागल्या आहेत. मात्र त्यातच मध्यंतरी एका नागरिकाने `एसटी` कर्मचारी व त्यांच्या सेवेची दखल घेत त्याचे कौतुक करणारी पोस्ट फेसबुक वर टाकली. ती चर्चेची ठरली. त्यानंतर आता हा जाहिरातीचा व्हीडीओ आला आहे. महामंडळाचे कर्मचारी हा व्हीडीओ चांगलाच व्हायरल करीत आहेत. ती तयार केली कोणी ? हे कोडे मात्र उलगडत नाही. त्याबाबत मुंबईच्या मुख्यालयाप्रर्यंत चौकशी केल्यावर देखील त्याची माहिती मात्र मिळाली नाही.







