मुंबई – मुंबईत विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर पोलिस आणि वाहतूक विभागाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. शनिवार-रविवारी मुंबईतल्या अंतर्गत रस्त्यांवर नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी सोमवारी सकाळी थेट मुलूंड टोल नाका, दहिसर चेक नाका अशा मुंबईच्या प्रवेशद्वारांवर नाकाबंदी केली. विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांना दंड आकारत त्यांना परत पाठवण्यात आले. त्यामुळे सर्वच टोलनाक्यांवर सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
वाहतूक कोंडीबद्दल मुंबई वाहतूक पोलिसांना विचारणा केली असता, लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश असल्याचे सांगण्यात आले. मुंबईतील प्रवेशद्वारांवर मुंबई पोलिस आणि वाहतूक विभागाने संयुक्तरित्या प्रशासनाच्या आदेशाचे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या अंमलबजावणी दरम्यान लावलेल्या नाकाबंदीत मोठ्या संख्येने विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांचा समावेश आहे. दोषी वाहनचालकांवर दंड आकारून त्यांना पुन्हा माघारी पाठवण्यात येत आहे. या कारणास्तव वाहतूक कोंडी झाल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.







