
अलिबाग-सोगावकर – अलिबाग तालुक्यातील रेवस बंदरात भरपूर प्रमाणात गाळ साचला आहे.त्यामुळे अमावस्या व पौर्णिमेच्या अगोदर व नंतर ४ दिवस पाणी कमी होते,त्यामुळे फेरीबोट बरोबरच (छोट्या बोटी)तरसेवा देखील धक्क्याला लागण्यापूर्वी मध्येच गाळात अडकतात,त्यामुळे प्रवाशांना भर समुद्रात तासनतास ताटकळत राहावे लागते,यामुळे शेकडो प्रवाशांची गैरसोय होत आहे, नुकतीच काही दिवसांपूर्वी तरसेवा गाळात अडकली होती,त्यामुळे होणारी मोठी दुर्घटना सुदैवाने टळली.याबाबत दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शी पत्रकार सोगावकर यांनी ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांना दुर्घटनेची माहिती दिली होती.याबाबत त्यांनी आपण वरिष्ठांकडे व शासनदरबारी वस्तुस्थिती मांडणार आहोत,असे सांगितले होते.
मुंबई-रेवस फेरीबोटने व रेवस-करंजा तर सेवेद्वारा वर्षाला ८ ते १० लाख प्रवासी प्रवास करतात. तरी या सेवा सुरळीत लागण्यासाठी प्रभावी पर्याय म्हणजे रेवस बंदर उत्तरेला २०० मीटर वाढवावे अशी आग्रही मागणी ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी राज्याचे बंदरे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना ३० सप्टेंबर रोजी मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
असोसिएशनची गेली अनेक वर्षांची ही मागणी शासन दरबारी पडून आहे. तरी या जिव्हाळ्याच्या प्रश्नात तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी मोकल यांनी मंत्रीमहोदयांसमोर मांडली, हे काम सुरू होण्यापूर्वी आपल्या खात्यांतर्गत महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाच्या ड्रेझर मार्फत रेवस बंदराच्या सभोवतातील गाळ काढण्यात यावा म्हणजे बंदरात पुरेसे पाणी राहील व फेरीबोट व तरसेवा गाळात न अडकता सुरळीत चालतील.
यादृष्टीने आवश्यक त्या सूचना बंदरे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांना दिल्या असल्याची माहिती असोसिएशनच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात विश्वास मोरे यांनी सांगितले.






