पारोळा (प्रतिनिधी) – कोरोना संशयित किंवा कोरोनाबाधित नसतांनाही पारोळा तालुक्यातील इंधवे येथील ७० वर्षीय वृध्देचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता रुग्णालय प्रशासनाने परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मयत वृद्धेच्या कुटुंबियांना क्वारंटाईनही करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जिराळी येथील रुक्माबाई रावण पाटील वय ७५ यांना गेल्या काही वर्षांपासून लघवीचा त्रास तसेच दम्याची व्याधी होती. सोमवारी रुक्माबाई यांना अचानक श्वास घ्यायला व नेहमीप्रमाणे लघवीचा त्रास झाला. कुटुंबियांनी तातडीने त्यांना ट्रिटमेंट सुरू असलेल्या खासगी डॉक्टरांकडे हलविले. डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र कुटुंबीयांनी पुढच्या उपचारार्थ पारोळा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रुख्माबाई यांना रुग्णवाहिकेतून पारोळा येथे हलवित असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पारोळा उपजिल्हा रुगणालयात पोचल्यावर तेथील प्रशासनाने नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला. तसेच याच गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे लागतील असे नातलगांना सांगितले . यानंतर तातडीने पाऱोळ्यातील स्मशानभूमित वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रुख्माबाई यांचा कुठलाही पद्धतीने रुग्णालयाकडून स्वॅब घेण्यात आला नव्हता तसेच त्या कोरोनाबाधित नव्हत्या. तरीही रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता परस्पर अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडले . यानंतर कोरोनाबाधित नसतांना वृद्धेच्या कुटुंबियांनाही दुसऱ्या दिवशी कोणतीही तपासणी न करता क्वारंटाइन करण्यात आले. रुग्णालयीन यंत्रणेच्या या अजब कारभाराबाबत कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली आहे.
Home Uncategorized कोरोनाबाधित नसतांनाही परस्पर केले वृध्देचे अंत्यसंस्कार; पारोळा उपजिल्हा रुग्णालयाचा अजब कारभार







