नाशिक (विशेष प्रतिनिधी) – जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर राहुड शिवारात मालेगाव आगाराची बसने अचानक पेट घेतला. या घटनेने बसमधील प्रवाशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर मंगरूळ येथील सोमा कंपनीच्या अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहचून ही आग विझवली.
मुंबई- आग्रा महामार्गावरून राहुड शिवारात मालेगाव आगाराची बस जात असताना बसने अचानक पेट घेतला. यावेळी या बसमध्ये एकूण २० प्रवासी होते. बसला आग लागताच चालकांच्या समय सूचकतेमुळे बस महामार्गाच्या कडेला उभी करून यातील प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र या घटनेत एका वयोवृद्ध आजीचे सामान आगीत जळून खाक झाले आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत, पोलिस हवालदार विजय जाधव, मुज्जमिल देशमुख, मंगेश डोंगरे आदींनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली. यामुळे या घटनेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.







