निधर्मी इन्सान साकारणारे अवलिया – आटपाडीचे उस्मान नबी शेख साहेब

– सादिक खाटीक आटपाडी ( सांगली )

भिन्न धर्म ,जाती पंथाच्या लोकांना कुणाही मानवाचे रक्त चालते, उच – नीच, गरीब – श्रीमंत, काळा – गोरा, स्त्री – पुरुष असा कसलाच भेद न पाळता रक्त सर्वांसाठी सारखेच वरदान ठरते, त्याच प्रांजळ , सोज्वळ, सात्वीक ,निर्मळ भावनेने रक्त – पाण्यासारखे सर्वात चपखल मिसळून जाणारे , प्रसंगी त्यांचेच होणारे उस्मान नबी शेख साहेब तथा सर्वाचे मामा , हे आटपाडी तालुक्याच्या राजकीय पटलावरील एक जिंदादील अवलिया व्यक्तीमत्व आहेत, हे त्यांचे राजकीय विरोधकही मान्य करतील .
तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा,
इन्सान की औलाद है इन्सान बनेगा ।
नफरत जो सिखाये वो धरम तेरा नही हैं
इन्सां को जो रौंदे वो कदम तेरा नहीं हैं।
१९५९ साली प्रदर्शित झालेल्या “धुल का फुल” या चित्रपटातील धर्मातीत व्यक्तीमत्वावर भाष्य करणाऱ्या या गीताच्या ओळीतला ओतप्रोत भरलेला माणूसकीचा विचार, जीवनसार आयुष्यभर कृतीशील जगलेले व्यक्तीमत्व म्हणजे शेख साहेब.

 

 

 

.
अॅडव्होकेट यु . एन . शेख अथवा उ. न . शेख या नावाने सर्वदूर ओळखले जाणारे शेख साहेब स्वातंत्र्या नंतरची ६० वर्षे आपल्या कार्यकर्तृत्वाने आटपाडी तालुक्याच्या राजकीय पटलावर सदैव चमकत राहीले आहेत .
१२ ऑक्टोबर १९३५ रोजी जन्मलेल्या शेख साहेबांनी घरनिकीतल्या प्राथमिक शिक्षणानंतर B A L L B पर्यतचे शिक्षण मुंबईतच पूर्ण केले. अतिशय धनाढ्य , सुखवस्तू ,सुसंस्कृत ,प्रगत कुटुंबात वाढलेल्या शेख साहेबांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात मुंबईत समाजवादी पक्षातून केली . तिथे चांगले राजकीय बस्तान बसू लागले असतानाच आई आणि मातृभूमीतील लोकांच्या आग्रहाखातर ते आटपाडी तालुक्यात परतले .

 

 

 

 

१९६० च्या दरम्यान आटपाडी कडे आलेल्या शेख साहेबांनी प्रथमतः घरनिकी या आपल्या गावची अभेद्य एकजूट करण्यात मोलाची भूमिका बजावली . गावातल्या विविध संस्था सतत बिनविरोध करण्यात ते यशस्वी होत असत . गावातल्या सेवा सोसायटी ,दुध संस्था ,ग्रामपंचायतीला मजबूती देण्यात खूप मोलाचे काम त्यांनी केले आहे . शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन , गाई म्हैशी संवर्धन यासाठी त्यांनी मोठे काम केले , अनेकांना घरकुले देताना, गावच्या पिण्याची पाण्याची समृद्ध योजना , प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक शाळा ते हायस्कुल पर्यतच्या शिक्षणाची मोठी व्यवस्था साकारण्यात ते यशस्वी झाले . गावातल्या प्रत्येक कुटूंबाला जी मदत करणे त्यांना शक्य आहे ती सर्व मदत घेऊन अठरापगड जातीच्या, शेकडोंच्या श्रमदानातून घरनिकी — विटा हा माधळमुठी पर्यतचा रस्ता, गावच्या शाळेच्या पाच खोल्या उभारण्यात ते ३० वर्षापूर्वी यशस्वी झाले . शासकीय मदत न घेता श्रमदानातून विकासकाम हे सुत्र आपल्या कृतीतून प्रत्यक्षात आणणारे शेखसाहेब राज्यातले पहिले व्यक्तीमत्व असू शकतील . ३५०० लोकवस्तीच्या घरनिकी गावामध्ये मराठा, धनगर समाजाचे मोठे प्राबल्य, इतर अठरा पगड जातींच्या लोकांची संख्याही मोठी . या सर्व बांधवांना इन्सानियतच्या धाग्यात बांधून घरनिकी गाव व परिसरात शांतता, सुव्यवस्था ,सलोख्याचे वातावरण सांधण्यात शेख साहेब नेहमीच यशस्वी झाले . बोटावर मोजता येतील एवढीच म्हणजे १० — १२ घरे मुस्लीमांची असताना ९० टक्के इतर धर्मीय बांधवांच्या अंतःकरणात स्थान मिळवित अनेक दशके त्यांचे नेतृत्व करणारे शेख साहेब हे खरोखरच लोकाभिमुख नेतृत्व आहेत. झरे पासून नेलकरंजी पर्यतच्या प्रत्येक गावात त्यांच्या हाकेला धावणारी अनेक कुटूंबे आजही आहेत . तालुक्यातल्या प्रत्येक गावात शेख साहेबांचा चाहता वर्ग आहे . हजारो कष्टकरी बांधवाचे निखळ प्रेम हीच आपली खरी श्रीमंती असे मानणारे ते आहेत .

 

 

 

 

पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे उपसभापती, सभापती , जिल्हा बँकेचे संचालक, तालुका स्तरावरील विविध संस्थाची पदे , पक्षीय पातळीवरचे पदाधिकारी म्हणून काम करणारे शेख साहेब, तालुक्याच्या राजकारणातले उच्चशिक्षित व्यक्तीमत्व म्हणून सुपरिचित आहेत . जात ,पात धर्माच्या पलीकडची माणुसकीची राहणी, अतिशय संयमी ,मुत्सद्दी, करारी, धाडसी आणि स्वाभीमानी नेतृत्व म्हणून शेख साहेबांना ओळखणारे हजारो सापडतील . कपाळावर बिनदिक्कतपणे नाम ओढणारे , दुसऱ्या दिवशी आंघोळ करे पर्यत भाळी नाम लेऊन सर्वत्र मिरविणारे, मंदिर मशिदीला आपलेसे करणारे, अनेक धार्मीक कार्यात , अगदी खरसुंडीच्या श्री सिद्धनाथांच्या सासनकाठी सोहळ्यात सह परिवार सहभागी होणारे , विविध मंदिर मशिदीच्या उभारणीत मोलाची भूमिका पार पाडणारे , प्रचंड श्रीमंती असताना सत्ता अथवा पैशाचा माज येवू न देता सामान्यांच्यात , सामान्यासारखे बनत त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणारे , शेख साहेब खरे खुरे अस्सल ग्रामीण भारतीय नागरीक आहेत . आटपाडी तालुक्याचे शिल्पकार कै. बाबासाहेब देशमुख दादा , माजी आमदार कै .आण्णासाहेब लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली काम केलेल्या शेख साहेबांना जिल्हा, राज्य स्तरावर काम करण्यासाठी फारशी मोठी संधी मिळू शकली नाही . अतिशय कर्तृत्व संपन्न, हजरजबाबी ,अभ्यासू आणि ध्येयवेड्या असणाऱ्या शेख साहेबांना विधानसभा, विधान परिषदेत संधी मिळाली असती तर ते , माजी राज्यपाल , माजी केंद्रीय मंत्री श्री . राम नाईक साहेबांच्या बरोबरीने निश्चितच देशभर गाजले असते . त्यांनी मुंबई सोडली नसती तर आज राज्य ,राष्ट्रीय स्तरावरील गाजलेले आदरणीय व्यक्तीमत्व म्हणून ते ओळखले गेले असते . विधानसभेच्या १५ निवडणूकात फक्त २ वेळाच आटपाडीचे नेते आमदार होवू शकले . आटपाडी तालुका म्हणजे अडगळीतल्या लोकांचा तालुका म्हणून सतत दाबण्याचा प्रयत्न केलेल्या विभाग, जिल्हा स्तर, आणि राज्य स्तरावरील अनेक नेत्यांना बाबासाहेब देशमुख दादा, आण्णासाहेब लेंगरे सारखी दिग्गज माणसे पचनी पडू शकली नाहीत ,तिथे शेखसाहेब, आण्णासाहेब पत्की सारख्या अल्पसंख्याकांचे काय ? कर्तृत्व असून ही केवळ जात, धर्मावरून जिल्हा ,राज्यस्तरावर त्यांना डावलले गेल्याचे शल्य आजही माझ्या सारख्या हजारोंना आहे .

 

 

 

मी, माझी पत्नी ,माझी मुले, माझे नातलग यांच्यातच आमदार खासदार , मंत्री पदे ,महामंडळाचे अध्यक्ष पद ,संचालक पद , इतर पक्षीय पातळीवरील उच्च पदस्थ पदे मिळाली पाहीजेत. तुम्ही आमचे भोई बनला पाहीजे, आम्हाला नमस्कार घालत राहीला पाहीजे, अशा छोट्या विचारधारेच्या ,समजेच्या अनेक राजकीय धुरंधरांनी अनेक शेखसाहेब, आण्णासाहेब नेहमीच उपेक्षीत ठेवले आहेत . हे या तालुक्याचे दुर्देव आहे .

 

 

 

पिढ्यान पिढ्याचा दुष्काळ , मागासलेल्या ,उपेक्षित वंचित आटपाडी तालुक्यात अनेक महत्वपूर्ण बाबी आणण्यात कै. बाबासाहेब देशमुख कै .आण्णासाहेब लेंगरे ही नेतेमंडळी यशस्वी झाली त्यामध्ये शेख साहेबांचे योगदान ही वाखाणण्या जोगे होते . पिण्याच्या, शेतीच्या पाण्यासाठी शेकडो गाव तलाव, पाझर तलाव , मोठे तलाव, शेती संवर्धणाची शेकडो कामे साकारण्यात शेख साहेब नेहमीच नेत्यांच्या बरोबर आघाडीवर राहीले . क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडींच्या सांगली ,सातारा ,सोलापूर जिल्ह्यातील १३ दुष्काळी तालुक्यांच्या लोकलढ्याचे ,पाणी परिषदेचे , शेख साहेब बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जातात. प्रारंभी टेंभू साठीच्या दिलेल्या प्रस्तावात आटपाडी तालुक्याचा उल्लेख नसल्याचे वृतपत्रातून आलेल्या बातम्यां तून समजल्यानंतर संतप्त भावनेतून नेत्याच्या समोर जाऊन नेत्याचे वाभाडे काढणाऱ्या शेख साहेबांचे राणाभीमदेव थाटातले रूप आटपाडी तालुक्याच्या पाण्याविषयी असलेल्या जळजळीत आस्थेचे ते प्रतिकच होते .

 

 

 

तालुक्याला कृष्णेचे शाश्वत पाणी मिळाले पाहीजे या भावनेने वर्षानुवर्षे झगडलेल्या अनेकांत एक असलेल्या शेख साहेबांना याचि देही , याचि डोळा आटपाडी तालुक्यात कृष्णा माईचे पाणी आल्याचे पहायला मिळाले हे ते त्यांचे परम भाग्य समजतात . पाण्यासारखे स्वच्छ , पारदर्शक आयूष्य व्यतित केलेल्या शेख साहेबांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना करोडो शुभेच्छा, नमस्कार , प्रणाम , सलाम .
तुम जियो हजारो साल
साल के दिन पचास हजार !
अशीच भावना व्यक्त करताना आमच्या सारख्या अल्पसंख्य कार्यकर्त्यांना ,वाटाड्या सारखे मार्गदर्शक, प्रेरक ठरणारे, कोणालाही मामा न बनवणारे, आम्हां सर्वांचे मामू अर्थात मामा आयुष्याचे शतक हसत खेळत पार करोत , हीच त्या विधात्याकडे नम्र प्रार्थना ।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here