एका अरण्यऋषींना निरोप!

maruti-chitampalli

– हेमराज बागुल.
थोर साहित्यिक अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना विदर्भवासियांनी काल प्रातिनिधिक स्वरुपात निरोप दिला. या कर्मभूमीतून ते सोलापूरच्या जन्मभूमीकडे आज रवाना झाले. त्यांना निरोप देण्यासाठी नागपुरात प्राचार्य स्व.राम शेवाळकर यांच्या निवासस्थानी आशुतोष शेवाळकर आणि अनिल गडेकर यांच्या पुढाकाराने छोटेखानी पण अतिशय भावस्पर्शी कार्यक्रम झाला. त्यांनी मला अतिशय अगत्याने बोलावल्याने एका हळव्या अन् कातर क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी लाभली.

 

 

 

नव्वदीतल्या चितमपल्ली सरांचे निम्मे आयुष्य गेले ते विदर्भात! मात्र ते सोलापूर येथील रहिवासी. या ऋषीचं मूळच शोधायचे झाले तर ते मूळचे तसे तेलुगू. पण नोकरीच्या निमित्ताने विदर्भात आले आणि ते विदर्भाचेच झाले. इथली सारी जंगले त्यांनी पायाखाली घातली. त्यातले पक्षी, प्राणी, वृक्ष या साऱ्यांमध्ये दडलेलं एक अद्भूत जगणं त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलं. श्रेष्ठ साहित्यिक साहित्यासोबत भाषाही समृद्ध करत असतो. या निकषावर चितमपल्ली सरांचे मोठेपण आणि योगदान शब्दशः अफाट आहे. परभाषांच्या आक्रमणामुळे आकसत चाललेल्या मराठीला त्यांनी तब्बल एक लाख नव्या शब्दांचं योगदान दिलंय. इंग्रजीतील काही शब्दांना अतिशय सोपे आणि समर्पक असे पर्यायी शब्द त्यांनी दिलेत. उदा. रातनिवारा. देशी भाषांसोबत जर्मन आणि रशियन भाषांचाही त्यांनी अभ्यास केलाय. आपल्या साहित्यातले संदर्भ अचूक असावेत म्हणून वयाच्या ८४ व्या वर्षी संस्कृतसारखी भाषा तेच शिकू शकतात!

 

 

 

 

गेली ७८ वर्षे ते डायरी लिहिताहेत. त्यातलं खूप काही प्रसिद्ध व्हायचं अजून बाकी आहे! पक्षीकोश यापूर्वी प्रसिद्ध झालाय. प्राणीकोश लवकरच प्रसिद्ध होईल वृक्षकोशाचेही काम झालेय. मत्स्यकोशाचे काम सुरू आहे. ही सारी कामे प्रचंड धडपडीची आणि भावी पिढ्यांसाठी अत्यंत मोलाची आहेत. मराठीत यासंदर्भात एवढ्या उंचीचे काम यापूर्वी झालेले नाही. याशिवाय त्यांच्या डोक्यात अजून खूप सारे लिखाण प्रस्तावित आहे. सोलापूरला गेल्यानंतर पुन्हा लिहिण्याचा हा जागर ते उमेदीने चेतवणार आहेत तेही आयुष्याच्या अशा घनगीर्द संध्याकाळी! जगण्याची ही दुर्दम्य आकांक्षा येते ती निसर्गाच्या निखळ संस्कारातून. जो चितमपल्ली यांनी आयुष्यभर अनुभवला!

 

 

 

 

आजवरच्या आयुष्यातली ६५ वर्षे जंगलात घालवणाऱ्या या अरण्यव्रतीच्या चेहऱ्यावर एक कृतार्थ सफलता आणि कृतज्ञता सदा विलसत असते. मुळात त्यांचा स्वभाव शांत अन् सोशिक. त्यासोबत संन्यासी वृत्ती, निसर्गाप्रती निस्सीम श्रद्धाभाव, व्रतस्थ कर्तव्यनिष्ठा, अविरत धडपड आणि सृजनशील रसिकता या साऱ्यांच्या मिलाफातून तयार झालेले त्यांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे साहित्यमंदिराच्या गाभाऱ्यात शांतपणे तेवत असलेला नंदादीपच जणू! जागतिक कीर्तीचे थोर पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली हे त्यांचे गुरू. ते एकदा म्हणाले, ‘चितमपल्ली, तुमचं जीवन मला द्या अन् माझं जीवन तुम्ही घ्या!’ एका महान गुरूने आपल्या तितक्याच महान शिष्याबद्दल काढलेले हे उद्गार चितमपल्ली सरांबद्दल सारं काही सांगणारे आहेत!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here