कन्नौज (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका कुटुंबाने मेंथीची भाजी समजून गांजा खाल्ला आहे. यानंतर कुटुंबातील सर्व लोकांना शेजाऱ्यांच्या मदतीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. तर या घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील कन्नौज या गावात घडली आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, कन्नौज येथील कोतवाली भागातील मियागंज गावात नवल किशोर नावाच्या व्यक्तीने नितेशला वाळलेली मेंथीची भाजी म्हणून गांजा दिला. नितेशने तो गांजा घरी नेवून दिला. यानंतर त्यांची भाजी बनवून कुटुंबाने खाल्ली. यानंतर सर्वांची तब्येत बिघडली. या घटनेत ओमप्रकाश, नितेश, मनोज कमलेश, पिंकी आणि आरती असे पाच जण बेशुद्ध पडले. यानंतर काही वेळाने शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच पोलिसांनी नवल किशोर याला अटक केली आहे. तर या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत. यातील उरलेला गांजाही ताब्यात घेतला आहे.







