जळगाव (संपादक सुनिल पाटील) – ‘‘नमस्कार श्रोते हो…’’ अशा मंत्रमुग्ध आवाजाने जळगाव आकाशवाणी खान्देशवासियांसह अवघ्या महाराष्ट्राला भल्या पहाटे जागविते. ज्ञान-मनोरंजन-शिक्षण या हेतूने अविरतपणे कार्यरत असलेली आकाशवाणी जळगावचा आज ४५ वा वर्धापनदिवस.
जळगाव आकाशवाणी केंद्राची स्थापना 16 ऑक्टोबर 1976 रोजी झाली. आकाशवाणी जळगाव केंद्राचे कार्यक्रम 963 किलोहटर्र्झ म्हणजेच 311.55 मीटरवर प्रक्षेपित केले जातात. हे कार्यक्रम जवळपास 200 किलोमीटरच्या परिक्षेत्रात रेडिओवर ऐकले जातात. स्थापना जरी 1976 ला झाली असली तरी कायमस्वरुपी स्टुडिओचे बांधकाम पूर्ण होवून 8 ऑक्टोबर 1978 पासून तो कार्यरत आहे. या केंद्राचे प्रक्षेपण केंद्र जळगावपासून 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरसोली येथे आहे. उपग्रह इन्सॅट 1 बी द्वारे कार्यक्रम सहक्षेपित करण्याचीही सोय आहे. या केंद्राच्या कार्यक्षेत्रात जळगाव, धुळे, नाशिक व बुलढाणा या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यामुळे या चारही जिल्ह्यातील सांस्कृतिक व वैचारिक वाटचालीत जळगाव आकाशवाणीचा मोलाचा वाटा आहे.
1976 पासून कार्यान्वित असलेले हे आकाशवाणी जळगाव केंद्र मोठ्या केंद्रांपैकी डिजीटलमध्ये रुपांतरित होणारे पहिले केंद्र आहे. सर्व लहान मोठ्या केंद्रांशी तुलना करता महाराष्ट्रात दुसरा तर देशात तिसर्या क्रमांकाचे हे केंद्र आहे. वेगवेगळ्या श्रृतिका व ‘फोन इन’ कार्यक्रम शेती व शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी वापरण्यात जळगाव आकाशवाणी केंद्र सर्वप्रथम आहे. जळगावच्या सर्वांगिण विकासात आकाशवाणीचा सक्रिय सहभाग आहे. शेती, व्यापार, आरोग्य, कला, क्रीडा, शिक्षण आणि संस्कृती यांना धरुन ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद साध्य करित शिस्त, नैतिकता आणि गुणवत्ता यांच्याशी तडजोड न करत वाटचाल करणारी जळगाव आकाशवाणी ही एक आगळीवेगळी संस्था आहे.
आता काळानुसार स्पर्धेला तोंड देत स्वत:मध्येही बदल घडवून आणत आहे. जळगाव आकाशवाणी आता स्मार्टफोनवरील अॅपमध्येदेखील उपलब्ध असून, लहानथोरांच्या खिश्यातल्या मोबाईलवरही आकाशवाणीचा आवाज घुमतो आहे.
जळगाव आकाशवाणी केंद्राला वर्धापनदिनानिमित्त बुलंद पोलीस टाइम्सतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!







