पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. खडसे यांच्या प्रवेशाबद्दल आपल्याला काही माहित नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. ते पुण्यात रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळेबेरे समजू नये. तसेच एकनाथ खडसे यांच्या यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
शिवेंद्रसिंहराजे विकास कामासाठी भेटून गेले. आशा भेटी होत राहतात. त्यामुळे असा काही अर्थ काढू नका. त्यात काही काळंबेरं नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नागपूर येथे होणार्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हे फेरबदल होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात काही खात्यांची अदलाबदल, तर काही नवीन चेहर्यांचा समावेश करून एखाद्या विद्यमान मंत्र्याला डच्चू मिळणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांच्याकडे कृषीखात्याची जबाबदारी देण्याचे संकेत मिळत आहेत.







