मुंबई (संपादक सुनिल पाटील) – कोविड महामारीच्या अडचणीच्या काळात कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड चालविणाऱ्या साम टीव्ही मराठी या टेलिव्हिजन चॅनेलच्या विरोधात ऑल इंडिया मिडिया एम्प्लॉईज असोसिएशन (AiMea-आयमा) या संघटनेने ठाणे येथील जिल्हा कामगार न्यायालयात दाद मागितली आहे.
साम टीव्ही मराठी या वृत्त वाहिनीचे सर्वेसर्वा अभिजित पवार तसेच संपादक पत्रकार निलेश खरे व साम टीव्हीचे अन्य व्यवस्थापकीय संचालक यांच्याविरोधात अनुचित कामगार प्रथा अंगिकारल्याबद्दल आयमा या संघटनेने दिनांक ०५ ऑक्टोबर रोजी याचिका दाखल केली आहे.
कोविडची महाभयंकर परिस्थिती ओढावल्यावर केंद्र व राज्य सरकारने एका नोटिफिकेशनद्वारे देशातील सर्व मालकवर्गाला आपापल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचना केली होती. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी देखील व्यक्तीशः तसे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने देखील मालक व कामगार वा कामगार प्रतिनिधी यांनी एकमेकांशी समोपचाराने चर्चा करून या कोविडच्या काळात मार्ग काढावा, असे निर्देश दिले आहेत. तरीही साम टीव्ही या वृत्त वाहिनीचे व्यवस्थापन हे धोरण अवलंबत नाहीत, ही गंभीर आणि राष्ट्राचे नुकसान करणारी बाब आहे, असे आयमाचे अध्यक्ष गोरक्ष धोत्रे यांनी या पत्रकाद्वारे म्हटले आहे.
संतापजनक बाब म्हणजे साम टीव्ही मराठी या वृत्त वाहिनीच्या व्यवस्थापनाने तेथे गेली दहा ते बारा वर्षे इमानेईतबारे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता लॉक डॉऊनचा फायदा घेत त्यांना नोकरीवरून काढण्यात आल्याचे पत्र परस्पर त्यांच्या घरी पाठवून दिले. विशेष म्हणजे, नोकरीवरून काढून टाकण्यात आलेले हे कर्मचारी साम टीव्ही मराठी चॅनेलच्या प्रारंभापासून कार्यरत होते. कोविड १९च्या सध्याच्या भयानक परिस्थितीत एकमेकांना सांभाळून घेण्याऐवजी साम टीव्ही मराठी या टेलिव्हिजन चॅनेलने स्वतःची जबादारी झटकण्याचे काम केले आहे त्याबद्दल ‘आयमा’ने तीव्र निषेध आणि संताप व्यक्त केला आहे. संघटनेच्या वतीने कामगार न्यायालयात ख्यातनाम विधितज्ज्ञ रुपाली देशपांडे कमलापूरकर या बाजू मांडणार आहेत.
साम टीव्हीप्रमाणेच अन्य काही टेलिव्हिजन चॅनेल्स तसेच इलेक्ट्रॉनिक मिडियात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विविधप्रकारे अन्याय केला जात असून त्याविरूध्द दाद मागण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांनी ‘आयमा’ या संघटनेशी संपर्क करून कामगार एकजुटीचे दर्शन व्यवस्थापनाला घडवावे असे आवाहन ‘आयमा’चे सरचिटणीस अजय घाटे व खजिनदार राजेंद्र दळवी यांनी केले आहे.








