घटस्थापना करण्यासाठी नेमक्या कोणत्या प्रकारचे पूजा साहित्य असावे? घटस्थापनेसाठीचे मंत्र आणि पूजा विधी काय आहे?
शारदीय नवरात्रात सुख, शांतता आणि समृद्धीसाठी घटस्थापना केली जाते. यंदा शनिवार, १७ ऑक्टोबर २०२० रोजी घटस्थापनेने नवरात्रारंभ होत आहे. यावर्षी आपणही घटस्थापना करू इच्छित असाल, तर कोणत्या प्रकारचे पूजा साहित्य असावे? घटस्थापनेसाठीचे मंत्र आणि पूजा विधी काय आहे?
नवरात्र घटस्थापनेचे साहित्य
घटस्थापना करण्यासाठी माती, पितळेचा तांब्या. पूजेसाठी जव, तीळ, सप्तमृतिका, सर्वोषधी, मध, लाल वस्त्र, कुंकू, नारळ, दीप, सुपारी, गंगाजल, आंब्याचे डहाळे, नाणी, विड्याचे पान.
घटस्थापनेचा मंत्र
घटस्थापनेसाठी पूजास्थळी बसल्यानंतर प्रथम स्वतःला आणि संपूर्ण पूजा साहित्य मंत्राने पवित्र करून घ्यावे. ‘ॐ अपवित्रः पवित्रोवा सर्वावस्थां गतोऽपिवा। यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः॥’, असा मंत्र म्हणावा. हा मंत्र म्हणून दर्भाने कलशातील पाण्याने आधी स्वतःवर आणि नंतर पूजा साहित्यावर प्रोक्षण करावे. उजव्या हातात अक्षत, फूल, जल, विडा, नाणी आणि सुपारी घेऊन नवरात्र दुर्गा पूजनाचा संकल्प करावा.
शारदीय नवरात्र संकल्प मंत्र
ॐ विष्णुर्विष्णुर्विष्णु:, ॐ अद्य ब्रह्मणोऽह्नि द्वितीय परार्धे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे, अष्टाविंशतितमे कलियुगे, कलिप्रथम चरणे जम्बूद्वीपे भरतखण्डे भारतवर्षे पुण्य (आपल्या क्षेत्राचे वा भागाचे नाव घ्यावे) क्षेत्रे बौद्धावतारे वीर विक्रमादित्यनृपते: २०७७, तमेऽब्दे शार्वरी नाम संवत्सरे सूर्य उत्तरायणे शरद ऋतो महामंगल्यप्रदे मासानां मासोत्तमे आश्विन मासे शुक्ल पक्षे प्रतिपदायां तिथौ शनि वासरे (गोत्राचे नाव घ्यावे) गोत्रोत्पन्नोऽहं अमुकनामा (स्वतःचे नाव घ्यावे) सकलपापक्षयपूर्वकं सर्वारिष्ट शांतिनिमित्तं सर्वमंगलकामनया- श्रुतिस्मृत्योक्तफलप्राप्त्यर्थं मनेप्सित कार्य सिद्धयर्थं श्री दुर्गा पूजनं च महं करिष्ये। तत्पूर्वागंत्वेन निर्विघ्नतापूर्वक कार्य सिद्धयर्थं यथामिलितोपचारे गणपति पूजनं करिष्ये। ‘यथोपलब्धपूजनसामग्रीभिः कार्य सिद्धयर्थं कलशाधिष्ठित देवता सहित, शारदीय नवरात्र श्री दुर्गा पूजनं महं करिष्ये।
नवरात्र घटस्थापना पूजा विधी
दुर्गा देवीची मूर्ती किंवा तसबीर स्थापन करावी. यानंतर मातीवर कलश ठेवावा. अक्षता, फूल आणि गंगाजल घेऊन वरुण देवतेचे आवाहन करावे. कलशात सर्वोषधी आणि पंचरत्न ठेवावे. कलशाखाली असलेल्या मातीत सप्तधान्य (जव, तीळ, तांदूळ, मूग, चणे, गहू, बाजरी) आणि सप्तमृतिका मिसळावे.
आंब्याची पाने कलशात ठेवावीत. कलशावर एका पात्रात धान्य भरून त्यावर एक दीप प्रज्ज्वलित करावा. यानंतर कलशावर लाल रंगाचे वस्त्र लपेटून नारळ ठेवावा.
कलशाखाली असलेल्या मातीत जव पसरावे. यानंतर देवीचे ध्यान करावे. ‘खड्गं चक्र गदेषु चाप परिघांछूलं भुशुण्डीं शिर:, शंखं सन्दधतीं करैस्त्रि नयनां सर्वांग भूषावृताम। नीलाश्मद्युतिमास्य पाद दशकां सेवे महाकालिकाम, यामस्तीत स्वपिते हरो कमलजो हन्तुं मधुं कैटभम।।’, असा मंत्र म्हणावा.
यानंतर गणपती आणि घरातील देवतांची पूजा करावी. महादेव शिवशंकर आणि ब्रह्मदेवांचे स्मरण करावे. यानंतर भगवती देवीची पूजा करून दुर्गा सप्तशती पठण करावी. दुर्गा सप्तशती तीन भागात विभागले असून, पठण करताना एका चरित्राचे करावे.
नवरात्रीची आरती
आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो ।
प्रतिपदेपासुनी घटस्थापना ती करुनि हो ।
मूलमंत्रजप करुनि भोंवते रक्षक ठेवूनी हो ।
ब्रह्माविष्णु रुद्र आईचें पूजन करिती हो ।। १ ।।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु०।।
द्वितीयेचे दिवशीं मिळती चौसष्ट योगिनी हो ।
सकळांमध्यें श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।
कस्तूरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो ।
उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो ।। २ ।।
उदो बोला उदो ।। ०।।
तृतीयेचे दिवशीं अंबे शृंगार मांडिला हो ।
मळवट पातळ चोळी कंठीं हार मुक्ताफळां हो ।
कंठींची पदकें कांसे पीतांबर पिवळा हो ।
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ।। ३ ।।
उदो बोला उदो ।। ०।।
चतुर्थीचे दिवशीं विश्र्वव्यापक जननी हो ।
उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो ।
पूर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो ।
भक्तांच्या माऊली सुर ते येती लोटांगणीं हो ।। ४ ।।
उदो बोला उदो ।। ०।।
पंचमीचे दिवशीं व्रत ते उपांगललिता हो ।
अर्घ्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तवितां हो ।
रात्रीचें समयीं करिती जागरण हरिकथा हो ।
आनंदे प्रेम तें आलें सद्भावें क्रीडतां हो ।। ५ ।।
उदो बोला उदो ।। ०।।
षष्ठीचे दिवशीं भक्तां आनंद वर्तला हो ।
घेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पितां देसी हार मुक्ताफ़ळां हो ।
जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळां हो ।। ६ ।।
उदो बोला उदो ।। ०।।
सप्तमीचे दिवशीं सप्तशंगगडावरी हो ।
तेथें तूं नांदसी भोंवति पुष्पें नानापरी हो ।
जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो ।
भक्त संकटीं पडतां झेलुनी घेसी वरचे वरी हो ।। ७ ।।
उदो बोला उदो ।। ०।।
अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायणी हो ।
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।
मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो ।
स्तनपान देऊनि सुखी केलें अंतःकरणीं हो ।। ८ ।।
उदो बोला उदो ।। ०।।
नवमीचे दिवशीं नवदिवसांचें पारणें हो ।
सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्नें नैवेद्यासी अर्पियली भोजनीं हो ।
आचार्य-ब्राह्मणां तृप्त केलें कृपें त्वा करुनी हो ।। ९ ।।
उदो बोला उदो ।। ०।।
दशमीच्या दिवशीं अंबा निघे सीमोल्लंघनीं हो ।
सिंहारुढ दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो ।
शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणीं हो ।
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो ।। १० ।।
उदो बोला उदो ।। ०।।







