कोलकाता – पश्चिम बंगालमधील कोलकाताच्या सॉल्ट लेक परिसरात घरगुती हिंसाचाराची घटना उघडकीस आली आहे. पत्नीने आपल्या पतीला बेदम मारहाण केली असून, या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चार वर्षांपासून पत्नीकडून छळ होत असल्याचं तरुणाचं म्हणणं आहे.
कोलकात्याच्या बिधाननगर (उत्तर) पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सॉल्ट लेक परिसरातील बीडी ब्लॉकमध्ये हा प्रकार घडला आहे. ३३ वर्षीय तरुणाला त्याची पत्नी बेदम मारहाण करत असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. शाब्दिक वाद झाल्यानंतर पत्नीने त्याला बेदम मारहाण केली. थप्पड लगावल्या. त्याचा हात पिरगळला. इतकेच नाही तर तिने त्याला सिगारेटचे चटकेही दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची चर्चा होत आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपूर्वी या दोघांचे लग्न झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून पत्नीकडून त्याचा छळ केला जात आहे, असा आरोप त्याने केला आहे. पत्नीने अनेकदा मारहाण केली आहे. माझ्या आई-वडिलांशी नीट वागत नाही, असे त्याने सांगितले.







