कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – शिवाजी विद्यापीठाच्या वतीने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (मॉक टेस्ट) घेण्यात येत आहे. शुक्रवारी मॉक टेस्टमध्ये बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना चक्क मराठीत प्रश्न विचारण्यात आले. सर्व्हर डाऊन व एका मोबाईलची कंपनीची सेवा ठप्प असल्याने परीक्षेवळी विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. चार दिवसांवर ऑनलाईन परीक्षा येऊन ठेपलेली असताना मॉक टेस्टच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे.
विद्यापीठाच्या वतीने 50 हजार विद्यार्थ्यांना मॉक टेस्टचा यूजर आयडी व पासवर्ड देण्यात आला. परीक्षा कशी द्यायची याबाबतचा व्हिडिओ विद्यापीठ संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. सर्व्हर डाऊनमुळे मॉक टेस्टची लिंक ओपन होत नाही. मॉक टेस्ट लिंक व ओटीपी नंबर ई-मेलवर मिळाला नसल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. सराव प्रश्नसंच देण्यात आले नाहीत, असे अभियांत्रिकीसह इतर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी म्हणाले. बी.एस्सीच्या विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट झाली. यात अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारण्यात आले. यातील बहुतांश प्रश्न मराठीत विचारण्यात आले होते. बीएसस्सीच्या विद्यार्थ्यांना मराठीत प्रश्न का? अशी विचारणा होत आहे. अद्याप बहुतांश जणांची मॉक टेस्ट झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था असून टेन्शन वाढले आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षेमागील संकटांची मालिका अद्याप सुरूच आहे. कोरोनामुळे आधीच परीक्षा कालावधी लांबला आहे. त्यात सप्टेंबर महिन्यात विद्यापीठ सेवकांच्या आंदोलनामुळे आठवडाभर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे आता परीक्षा तारखा दुसर्यांदा पुढे ढकलण्याची वेळ शिवाजी विद्यापीठावर आली आहे.







