धरणगाव (प्रा.पी.एम.पाटील) – तालुक्यातील साळवा गावातील इंदिरानगरमधील भूमिगत गटारीचे काम गेल्या २ अडीच वर्षापासून झाले आहे परंतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, या कामाच्या चौकशीकरिता तातडीने ग्रामसभा घेण्याची मागणी साळवे ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांकडे इंदिरानगरवासियांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
या भूमिगत गटारीच्या चुकीच्या कामामुळे इंदिरा नगरच्या संपूर्ण गल्लीत या गटारीचे पाणी साचते. या साचलेल्या पाण्यामुळे अनेक गंभीर आजार निर्माण होण्याची परिस्थिती आहे. या साचलेल्या पाण्यात डास व किड्यांची मोठ्या प्रमाणात पैदास होत असून, परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. ह्या कामात मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे लक्षात येत असून, या कामी संबंधित ठेकेदार व पदाधिकारी दोषी असल्याचे दिसून येते. तरी त्वरित या गटारीचे काम पूर्ण करून पाण्याची विल्हेवाटही लावावी. याबाबत निर्णय घेण्यासाठी दोन दिवसात तातडीची ग्रामसभा घेण्याची व या कामाची चौकशी करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. चौकशी न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला असून, त्यानंतर घडणाऱ्या प्रकारास संबंधित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व अधिकारी जबाबदार राहतील. याबाबत संबंधितांनी त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी करणाऱ्या या निवेदनावर सतीश कृष्णा पवार, अतुल रामदास बोराडे, अशोक सुकलाल सोनवणे, कृष्णा शांताराम पाटील यांच्या स्वाक्षऱ्या असून, निवेदनाची प्रत गटविकास अधिकारी धरणगाव, विस्तार अधिकारी धरणगाव, तहसीलदार धरणगाव, जळगाव जिल्हा जागृत जनमंच, प्रांत एरंडोल व सर्व वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना पाठविण्यात आल्या आहेत.







