अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हाल; सामान्य नागरिकांना उद्देशून लिहिले भावनामय पत्र
नाशिक (विशेष प्रतिनिधी) – परतीच्या पावसामुळे सबंध महाराष्ट्रात अतिवृष्टीने धुमाकूळ माजविला असून त्याला नाशिक जिल्हाही अपवाद नाही. जिल्ह्यातील सर्वच भागात अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या शेतातील हाताला आलेल्या पिकाचे मोठे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी राजाचे हाल वर्णन करणारे ‘शेतकरी नावाची बाप माणसं’ हे महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे नाशिक संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी लिहिलेले पत्र खास बुलंद पोलीस टाइम्सच्या वाचकांसाठी…
शेतकरी नावाची माणसं माहितीयेत ? अत्यंत वाईट जमात. यांच्यावर कितीही अन्याय करा. तरीही ही शेती करतातच. स्वत:चं आणि दुनियेचं पोट भरायची कसली हौस असते ती त्यांनाच माहिती ?
ऊन ४५ डिग्रीवर गेलं की हि माणसं अशा उन्हातपण रानात सऱ्या तोडताना दिसतात. काळवंडतात. करपतात. पार भाजून निघतात. पण, धान्य पिकवायच्या मागं लागलेली असतात.
मरणाची थंडी पडते, तेव्हा शेतकरी नावाची लोकं अशा थंडीतपण पाटात उभी असतात. यांच्या पायाला मुंग्या येतात. गारठून पाय बधीर होतात. दगडाची चिपळी सर्रकन पाय कापून टाकते अन् पाण्यासोबत रक्ताची धार वाहू लागते. तरी यांना फिकीर नसते. कारण यांना दुनियेचं पोट भरायचं असतं.
परवाच्या पावसात उभं पिक वाचवता येईल या भाबड्या अपेक्षेनं सोसाट्याच्या वाऱ्यातही ही माणसं रानात पोहचली. डोक्यावरचा काळा डोह धो धो बरसला आणि ही मंडळी डोक्याला हात लावून बांदावर बसली. त्यांनी डोळ्यादेखत बांध फुटताना पाहिला. डोळ्यातलं तळं पुसत शेतातलं तळं बघितलं. वाहून चाललेलं सोयाबीन, भिजलेला कापूस, नासलेली केळी, सडलेली बाजरी, कांदा, द्राक्ष, तांदूळ अशी हातातोंडाशी आलेली हजारो पिकं बघत ही माणसं निर्जीव होऊन गेली.
त्यांना आता सजीव करण्याची जबाबदारी सरकारची आहे भोळी असली तरी बापमाणसंहेत. त्यांना आता मदतीची गरजहे. सरकारने ठरवलं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले जातील. आपला पक्ष, आपला धर्म, आपली जात, आपला जिल्हा सगळं विसरुन आपण आपल्या बापासाठी उभं राहिलं पाहिजे.
सध्या सोशल मिडीयावर हे पत्र धूम करीत असून, शेतकरी राजाची व्यथा मांडणाऱ्या या पत्राला नेटकऱ्यांनी तेवढेच भावनांनी ओतप्रोत असलेली उत्तरे दिली आहेत.








