नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) | सध्या प्रचंड आर्थिक तोट्यात असलेल्या ‘भारत संचार निगम लिमिटेड’ (BSNL) म्हणजेच दूरसंचार विभागाची लाखो रुपयांची मालमत्ता पूर्णपणे वाऱ्यावर पडली आहे. देवळा तालुक्यातील विठेवाडी शिवारात रस्त्यालगत असलेले दूरसंचार विभागाचे लाखो रुपये किमतीचे निकामी, तारविरहित लोखंडी पोल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. विठेवाडीतील जागरूक तरुणांनी शिताफीने या चोरट्यांचा डाव हाणून पाडला आणि त्यांना रंगेहाथ पकडले. मात्र, देवळा पोलिसांच्या लेट लतीफ कारभारामुळे हे चोरटे गावकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी झाले. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
रविवार, दिनांक ३१ मे रोजी रात्रीच्या सुमारास विठेवाडी शिवारात रस्त्यालगत उभे असलेले आणि काही जमिनीवर आडवे पडलेले दूरसंचार विभागाचे लोखंडी पोल एका संशयास्पद रिक्षात (क्र. MH-02-CE-7395) भरले जात होते. हा प्रकार विठेवाडी गावातील काही तरुणांच्या निदर्शनास आला. तरुणांनी तातडीने धाव घेत सदर ऑटो रिक्षा अडवली. यावेळी रिक्षाचालक आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना गावकऱ्यांनी चोरीच्या मुद्देमालासह जागीच पकडले.
तरुणांनी चोरट्यांना आणि मुद्देमालाने भरलेली रिक्षा विठेवाडी गावातील ‘जिजाऊ मंगल कार्यालय’ येथे आणून जमा केली. यानंतर देवळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. मात्र, माहिती देऊनही पोलीस तब्बल अडीच ते तीन तास घटनास्थळी पोहोचले नाहीत. पोलिसांची वाट पाहत असतानाच, अखेर पोलिसांची गाडी उशिरा दाखल झाली. मात्र, पोलीस आल्याचे पाहताच आणि पोलिसांची दिरंगाई लक्षात घेऊन दोन्ही भामटे व रिक्षाचालक चोरलेले पोल तिथेच टाकून गावकऱ्यांच्या डोळ्यादेखत घाईघाईने पसार झाले.
गावकऱ्यांनी अत्यंत धाडसाने आणि शिताफीने दोन चोरट्यांसह रिक्षामालकाला पकडून ठेवले होते. असे असतानाही पोलीस उशिरा आल्याने ते तिथून पसार कसे झाले? हा कळीचा आणि गंभीर प्रश्न सध्या सर्वसामान्य जनता देवळा पोलिसांना विचारत आहे. असे असले तरी, घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी रिक्षामालक आणि पळून गेलेल्या इतर दोघांची नावे पोलिसांकडे सुपूर्द केली आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी जप्त केलेली रिक्षा नंतर सोडून दिल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संभ्रम आणि संताप पसरला आहे.
सध्या दूरसंचार विभागाच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपयांची यंत्रणा धुळीस मिळत असतानाच, दुसरीकडे देवळा, लोहोणेर, विठेवाडी, भऊर आणि वसंतदादा सहकारी साखर कारखाना परिसरात रोजच छोट्या-मोठ्या चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. रविवारी भरणार्या देवळा येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरी आणि पाकीटमारी करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट झाला आहे.
या वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र, देवळा पोलिसांनी अधिक सतर्क राहून रात्रीची गस्त (नाईट पेट्रोलिंग) वाढवावी आणि या चोऱ्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी विठेवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.







