पिंपळगाव (जळगाव प्रतिनिधी शेख जावीद) | जमीन व्यवहारात मध्यस्थी केल्याचा खोटा दावा करून भारतीय सैन्य दलातील एका जवानाकडे आणि त्यांच्या वयोवृद्ध वडिलांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भोजे (ता. पाचोरा) येथील संशयित आरोपी निलेश नामदेव उभाळे याच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पाचोरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, भोजे येथील रहिवासी आणि भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान विलास बाबूलाल जाधव यांनी १ जून रोजी पिंपळगाव पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, भोजे शिवारातील एका प्लॉटच्या खरेदी-विक्री व्यवहारात आरोपी निलेश उभाळे याने कोणतीही मध्यस्थी केली नव्हती. असे असतानाही, केवळ पैशांच्या हव्यासापोटी उभाळे याने आपण या व्यवहारात मध्यस्थी केल्याचा खोटा दावा केला आणि फौजी जवान जाधव यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली.
फिर्यादी विलास जाधव यांनी उभाळेला पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने जाधव यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधून अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगवे लागतील, अशी धमकी देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने केलेल्या या सर्व धमक्यांचे आणि शिवीगाळीचे मोबाईल रेकॉर्डिंग (Call Recording) फिर्यादी जवानाकडे उपलब्ध असून, पोलिसांनी या ऑडिओ क्लिपची पडताळणी करून गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी निलेश उभाळे एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने जवानाच्या पाठीमागे त्यांच्या वयोवृद्ध वडिलांनाही पैशांसाठी वारंवार त्रास देऊन धमकावण्यास सुरुवात केली. देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानाला आणि त्याच्या कुटुंबाला गावात अशा प्रकारे धमकावले गेल्याने संपूर्ण जाधव कुटुंब तीव्र मानसिक तणावाखाली आले असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी निलेश नामदेव उभाळे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०८(५): (खंडणी वसूल करणे/प्रयत्न करणे), कलम ३५२: (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे), कलम ३५१(२) आणि ३५१(३): (गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे) कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल रामनाथ पवार करत आहेत.
दरम्यान, संशयित निलेश उभाळे याच्याबाबत परिसरात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. उभाळे हा विविध शासकीय कार्यालये, थेट प्रधानमंत्री कार्यालय (PMO) आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे (CMO) खोट्या तक्रारी तसेच माहिती अधिकाराचा (RTI) हत्यार म्हणून वापर करायचा. शासकीय अधिकाऱ्यांवर व लोकांवर दबाव निर्माण करून अनेक प्रकरणांमध्ये त्याने आर्थिक तडजोडी केल्याचे आरोप स्थानिक पातळीवर होत आहेत. त्याच्या या कारनाम्यांमुळे त्रस्त झालेले आणखी काही नागरिकही आता खंडणी संदर्भात तक्रारी दाखल करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.







