जळगाव (प्रतिनिधी जावीद शेख) | “परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, सातत्य आणि अढळ आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते,” हे फैजपूर येथील अझर शेख याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत गरिबीशी दोन हात करत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अझरने मुंबई पोलीस दलात निवड होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण फैजपूर परिसराची मान अभिमानाने उंचावली असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अझर शेख यांचे कुटुंब फैजपूर येथील एका अत्यंत छोट्याशा १० बाय १२ च्या खोलीत राहते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. घर चालवण्यासाठी त्याचे वडील ‘बाबू ड्रायव्हर’ हे ट्रक चालक म्हणून रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून कष्ट उपसत होते. वडिलांचे हे अथांग कष्ट आणि घरातील परिस्थिती पाहून अझरने लहानपणापासूनच कमालीची जाणीव ठेवली व वयाच्या मानाने मोठी जबाबदारी स्वीकारली.
अझरने आपले शिक्षण सुरू असतानाच कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी मिस्तरी (बांधकाम मजूर) म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याचे वेळापत्रक अत्यंत खडतर होते. दिवसभर उन्हातान्हात कष्टाचे मिस्तरी काम करायचे आणि रात्रीच्या वेळी थकलेल्या शरीरानेही पुस्तके हातात धरून अभ्यास करायचा, सोबतच पोलीस भरतीसाठी लागणारी मैदानी तयारी (ग्राउंड प्रॅक्टिस) करायची, असा त्याचा रोजचा संघर्ष होता. अनेक आर्थिक संकटे, राहण्यासाठी अपुरी जागा आणि मर्यादित साधने असतानाही त्याने आपले ध्येय कधीही डोळ्याआड होऊ दिले नाही.
मुंबई पोलीस भरतीचे हे अझरसाठी शेवटचे वर्ष होते. ‘करा किंवा मरा’ अशी परिस्थिती असल्याने अझरने आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि नेहमीपेक्षा अधिक कठोर परिश्रम घेतले. अखेर, त्याच्या या अहोरात्र घेतलेल्या कष्टाला यश आले आणि त्याची मुंबई पोलीस दलात मानाची निवड झाली. अझरच्या या यशामुळे त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले असून त्यांच्या आयुष्यातील दीर्घ संघर्ष सार्थकी लागला आहे.
अझर शेख याने मिळवलेले हे यश केवळ त्याच्या कुटुंबापुरते मर्यादित नसून, प्रतिकूल परिस्थितीचे रडगाणे गाणाऱ्या ग्रामीण भागातील शेकडो गरिबांच्या मुलांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी एक मोठा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. अझरच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्याचा मित्रपरिवार, नातेवाईक, शिक्षक तसेच फैजपूर परिसरातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून त्याचे ढोल-ताशांच्या गजरात कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.







