शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) | श्री साईबाबा संस्थान संचलित शैक्षणिक संकुलाचे अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते कैलासराव शेजवळ हे नुकतेच आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या सेवानिवृत्तीनिमित्त शिर्डी येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांच्या प्रशासकीय व सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी आणि वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या.
कैलासराव शेजवळ यांच्या निरोप समारंभ व सत्कार प्रसंगी शिर्डीतील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. यात साई सेवक हाजी अब्दुल बाबा यांचे पणतू गफार खान पठाण, युवा नेते नानासाहेब शिंदे, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आसारामजी वारे, ॲड. अविनाशजी शेजवळ, वरिष्ठ पत्रकार संजय महाजन यांच्यासह अनेक साईभक्त, शैक्षणिक क्षेत्रातील सहकारी आणि नागरिक उपस्थित होते.
श्री साईबाबा संस्थानच्या शैक्षणिक संकुलात अधिकारी म्हणून काम करताना कैलासराव शेजवळ यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने आपली जबाबदारी पार पाडली. नोकरीत असतानाच त्यांनी आपल्या मृदू स्वभावाने आणि सामाजिक कार्याने शिर्डी व परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच निस्पृह सेवेचा सन्मान करण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सत्कारानंतर शेजवळ यांनी सर्वांचे आभार मानले.






