मुंबई (जॉनी वाझ) – अॅक्शन सीनसाठी खासकरुन ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सनी देओल. अभिनेता ते खासदार असा प्रवास करणारा सनी देओल आजही त्याच्या संवादफेक कौशल्यामुळे आणि शरीरयष्टीमुळे ओळखला जातो. चित्रपटामध्ये दमदार आणि रागीट भूमिका साकारणारा हा अभिनेता खऱ्या आयुष्यातदेखील असाच असल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे, ‘डर’ चित्रपटाच्या सेटवर सनीने रागाच्या भरात त्याची जीन्स फाडली होती. एका कार्यक्रमात सनीने याविषयी खुलासा केला.
‘बेताब’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता सनी देओल याने कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटानंतर सनीच्या करिअरची गाडी वेगाने धावू लागली. त्याने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. यातलाच एक चित्रपट म्हणजे ‘डर’. अभिनेता शाहरुख खान, जुही चावला आणि सनी देओल यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला. मात्र, याच चित्रपटाच्या सेटवर सनीला राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. ‘डर’च्या सेटवर सनी आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यामध्ये काही कारणास्तव वाद झाला होता.
“चित्रपटामध्ये मी एका कमांडोची भूमिका साकारत आहे. सहाजिकच कमांडो हे फिट आणि सजग असतात. त्यामुळे कोणताही मुलगा त्यांच्या समोर येऊन कसा काय हात उचलू शकतो. हा जर त्या कमांडोचं लक्ष नसेल तर त्याच्यावर एखाद्याने हात उचलणं समजू शकतो. पण, या कथेत कमांडोच्या समोर एखाद्या येऊन त्याला मारतोय. ही गोष्टचं पचनी पडत नाही. त्यामुळे जर हा सीन असा असेल तर मी ती भूमिका करु शकत नाही”, असं सनीने यश चोप्रा यांना सांगितलं होतं.
पुढे तो म्हणला, “यश चोप्रा यांच्याशी बोलताना मला राग इतका अनावर झाला होता की, माझ्या हाताने मी माझीच पॅण्ट कधी फाडली हे माझं मलाच कळलं नाही. माझं इतकंच म्हणणं होतं की खलनायकाला प्रमाणापेक्षा जास्त वजन दिलं जात होतं”.दरम्यान, या चित्रपटानंतर सनी आणि शाहरुख यांच्यात वाद झाला अशा अनेक अफवादेखील पसरल्या होत्या. मात्र, या चर्चांना सनीने पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळालं.







