बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांचे निधन

– योगेश शुक्ल
बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांचे वयाच्या 71 व्या वर्षी मुंबईतील गुरुनानक रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. श्वासोच्छवासात त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे आज पहाटे (3 जुलै) दोन वाजता सरोज खान यांनी अखेरचा श्वास घेतला. हवा हवाई, तम्मा तम्मा, एक दोन तीन, धक धक करने लगा, डोला रे डोला यासारख्या गाजलेल्या गाण्यांची कोरिओग्राफी त्यांनी केली होती. श्वासोच्छवासात त्रास होत असल्याने मुंबईतील गुरुनानक रुग्णालयात त्यांना 20 जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांची ‘कोविड’ चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यांच्या पार्थिवावर सकाळी अंत्यसंस्कार केले जातील. बॉलिवूडची नृत्यसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
किशनचंद सद्धू सिंह आणि नोनी सद्धू सिंह यांच्या घरी जन्मलेल्या सरोज यांचे खरे नाव निर्मला किशनचंद्र संधु सिंह नागपाल होते. फाळणीनंतर सरोज यांचे कुटुंब पाकिस्तानातून भारतात स्थायिक झाले. सरोज खान यांचा जन्म 1948 मध्ये मुंबईत झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षीच ‘नजराना’ या चित्रपटातून त्यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत बाल कलाकार म्हणून पदार्पण झालं होतं. या बालकलाकाराची कारकीर्द पुढे नृत्यक्षेत्रामध्ये बहरली. पुढे हा कलाकार ग्रुप डान्सर बनला. त्यानंतर असिस्टण्ट डान्सर आणि 1974 मध्ये ‘गीता मेरा नाम’साठी त्यांनी ‘डान्स मास्टर’ म्हणून पहिल्या सिनेमाला कोरिओग्राफी केली. तो सिनेमा होता, ‘गीता मेरा नाम’. तेव्हापासून ते आज पर्यंत त्यांनी अख्ख्या बॉलिवूडला आपल्या तालावर त्यांनी नाचवलं होते. कोरिओग्राफर सरोज खान मास्टरजी म्हणून ओळखल्या गेल्या. पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ सिनेमातील ‘हवा हवाई’ गाण्यामुळे. ‘चांदनी’ सिनेमातील गाण्यांच्या नृत्य दिग्दर्शनाला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर माधुरी दीक्षित सोबत तेजाब, बेटा अशा सिनेमातील गाण्यांना केलेल्या कोरिओग्राफीला तुफान यश मिळालं. गेल्या ४० वर्षांपेक्षा जास्त काळ सरोज खान यांनी इण्डस्ट्रीमध्ये काम केले. या काळात डान्सच्या फॉर्म्समध्ये, स्टाइलमध्ये खूप परिवर्तन झालं.
जवळपास 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी दोनशेहून अधिक सिनेमासाठी, दोन हजारपेक्षा जास्त गाणी त्यांनी कोरिओग्राफ केली होती. हवा हवाई, तम्मा तम्मा, एक दोन तीन, धक धक करने लगा, डोला रे डोला यासारख्या गाजलेल्या गाण्यांची कोरिओग्राफी त्यांनी केली होती.माधुरी दीक्षित ही त्यांची सगळ्यात आवडती अभिनेत्री होती. तिचा डान्स त्यांना प्रचंड आवडायचा. त्यांनी सगळ्यात जास्त हिट गाणी माधुरीसोबतच दिली. माधुरी दीक्षितवर चित्रीत केलेलं ‘कलंक’ सिनेमातलं ‘तबाह हो गये’ हे त्यांनी कोरिओग्राफ केलेलं शेवटचं गाणं ठरलं. ‘देवदास’ चित्रपटातील ‘डोला रे डोला’, तामिळ सिनेमा ‘श्रीनगरम’मधली सगळी गाणी, आणि ‘जब वी मेट’मधील ‘ये इश्क हाय’ या गाण्यांच्या नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना तीन वेळा ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त झाला. त्यांनी अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज म्हणून काम पाहिले.
हिंदी सिनेसृष्टीमध्ये आजवर कित्येक नायिका आल्या. या नायिकांना जिथे कोरिओग्राफीचा स्पर्श झाला तिथे या नायिका बहरल्या. हिंदी इण्डस्ट्रीमधलं सरोज खान हे असं नाव होते, की ज्यांनी या प्रत्येकी बरोबर काम केलंय. साधना, वैजयंतीमाला, कुमकुम, हेलन, शर्मिला टागोर, माला सिन्हा, वहीदा रहमान, झीनत अमानपासून ते रेखा, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, उर्मिला मातोंडकर, ऐश्वर्या राय, करीना कपूर आणि सनी लिओनी या अभिनेत्रींना सरोज खान यांनी नृत्याचे धडे दिले. ‘देवदास’, ‘श्रृंगारम’ आणि ‘जब वी मेट’ या सिनेमातील उत्कृष्ट कोरिओग्राफीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आठहून अधिक फिल्मफेअर अवॉर्ड्स त्यांना मिळाली होती. ‘लगान’ या सिनेमासाठी त्यांना अमेरिकन कोरिओग्राफी अवॉर्ड मिळाला होता.
सरोज खान यांचे लग्न केवळ १३ व्या वर्षी झाले होते. ४३ वर्षांचे डान्स मास्टर बी. सोहनलाल यांच्याशी इस्लाम कबूल करून लग्न केले होते. बी सोहनलाल यांचे पहिले लग्न झाले होते. तसेच ते चार मुलांचे वडिलही होते. सरोज खान यांनी आपल्या लग्नाबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मी शाळेत जात होती. मला नाही माहिती की लग्नाचं महत्त्व काय होतं. एके दिवशी मास्टर सोहनलाल यांनी गळ्यात एक धागा बांधला, त्यांना वाटलं की त्यांचे लग्न झाले आहे. सरोज खान यांच्या लग्नात खूप अडचणी आल्या. सरोज खान यांना माहिती नव्हते की त्याचे पती यांचे पूर्वीच लग्न झाले आहे. मुलगा राजू खान यांच्या जन्मानंतर त्यांना या गोष्टीचा खुलासा झाला. तेव्हा त्या १४ वर्षांच्या होत्या. १९६५ मध्ये त्यांनी दुसऱ्या बाळाला जन्म दिला. पण त्याचा आठ महिन्यानंतर मृत्यू झाला. सरोज खानच्या मुलांना त्यांच्या पतीने नाव देण्यास नकार दिला. यामुळे दोघे वेगळे झाले. सोहनलाल याना हार्ट अटॅक आल्यानंतर ते पुन्हा एकत्र राहू लागले. या दरम्यान, त्यांच्या मुलगी कुकूचा जन्म झाला. सरोज खान यांनी दोघांचे पालन पोषण एकट्यानेच केले.
सरोज खान नेहमीच आपली परखड मते, वक्तव्याबद्दल चर्चेत राहायच्या. नवोदित डान्सर्सला योग्य न्याय मिळत नाही, डावललं जातं, गटबाजी सुरु झाली आहे, यावर अलिकडच्या काळात त्यांनी वारंवार आवाज उठवला होता. सरोज खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
(९६५७७०१७९२) https://bulandpolicetimes.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here