सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करुन दिलासा द्यावा – एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

एरंडोल (प्रतिनिधी) – जग सध्या कोरोना व्हायरसमुळे त्रस्त आहे. या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. उद्योगधंदेदेखील पुर्वपदावर आलेले नाही. बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करीत आहे, अशा कठीण प्रसंगी पेट्रोल व डिझेलच्या महागाईचे आणखी एक संकट लोकांवर ओढवले आहे. या दुहेरी संकटाचा सामना करताना जनतेची तारांबळ उडत आहे.
७ जून पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ होत आहे. शनिवारपर्यंतची दरवाढ पाहता पेट्रोलमध्ये प्रतीलिटर ९.१२ रुपये तर डिझेलमध्ये ११.१ रुपये वाढ करण्यात आली. त्यामुळे देशभरात पेट्रोलच्या किंमती ८७ – ८८ रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. दिल्लीत तर डिझेल पेट्रोलपेक्षा महाग झाले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर निच्चांकी पातळीवर असताना त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. वास्तविकत पाहता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीचा विचार करून देशातंर्गत इंधनाचे दर ठरविले जात असतात. सध्या ती पारदर्शकता राहिलेली नाही. २०१४ मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क ९.४० रुपये तर डिझेलवर ३.५६ रुपये होते. सद्य परिस्थितीत हेच शुल्क ३२.९८ रुपये पेट्रोल व डिझेल ३९.८३ रुपये असे आहे. सर्वसामान्य जनता दुहेरी संकटात असताना, या प्रश्नी भारताच्या राष्ट्रपतींनी लक्ष घालून, या प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी एरंडोल काँग्रेस कमिटीने एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन, शहराध्यक्ष संजय पाटील, रईस अहमद शेख, प्रा.आर.एस. पाटील, इमरान मुश्ताक सय्यद, शेख सांडू, मदनलाल भावसार, संजय कलाल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here