सौंजन्य : इंजि.कुबेर जाधव (वसाका )

आयुष्य कुणासाठी कधीच थांबत नाही. तुम्हीं ही पुढे जात राहतात. तुमचा भूतकाळ पाठीमागे सोडून. पण काही जुन्या जखमा असतातच ठसठसणाऱ्या…
मी जिथे बसलोय त्या डोंगरावरून मला कारखान्याचा संपूर्ण परिसर दिसतोय. साधारण तीनशे साडेतीनशे एकराचे क्षेत्र. प्रचंड मोठा परिसर.
उसाचे ट्रक्स, बैलगाड्या. कामगारांची, शेतकऱ्यांची प्रचंड वर्दळ. वातावरणात एक प्रकारचा उत्साह. मध्येच बारा च्या ठोक्याला भोंगा वाजतोय. शिफ्ट बदलली म्हणून कामगार घाईत आत जातांना दिसतायत. तरं शिफ्ट संपवून थकलेले जीव निवांत गप्पा मारत बाहेर पडतायत.
नाक्यावर प्रत्येक गाडी ची नोंद केली जाते आहे. चिमनीतून धुराबरोबरच ‘ उत्साह ‘ ही विसर्जित होतोय. कारखान्याच्या गुरुदत्त मंदिरात आरती चालली आहे. कालपासून कुठली तरी भजनी मंडळी आहेत मुक्कामाला. मधूनच त्यांच्या टाळ, मृदुंगाच्या सरावाचा आवाज. कोपऱ्यावरच्या तिघी चौघी हॉटेल्स माणसांनी गजबजून गेल्यात. शेतकऱ्यांनी आपली न्याहारी त्यांच्या टेबलावर मांडलीय. सोबत गरमा गरम भजी ची ऑर्डर घेऊन पोरगं गेलंय आता. वर घट्ट दुधाचा चहा. कारखान्याची अधिकारी मंडळी रुबाबात आपल्या ऑफिस मध्ये ये जा करतेय. परिसरातल्या शाळेतील विद्यार्थी प्रार्थनेसाठी पटांगणावर जमलेत. साखरेच्या थैल्या आणि गुळाच्या भेल्या व्यवस्थित बाजूच्या गोडाऊन मध्ये ठेवल्या जात आहेत. तिथून पुढे त्या देशभर प्रवास करणार आहेत.
केन पेमेंट घेऊन मुरार पाटील मिशीवर तावं मारत खुशीने गावी परततोय. त्याला तालुक्याला जावून भरपूर सामान घ्यायचं आहे. तालुक्यातील प्रत्येक व्यापारी त्याच्यावर खुश असणार आहे कारण तो लागलीच सर्वांचे पेमेंट करून मोकळा होणारं आहे.
पहिली शिफ्ट संपवून, रतन भोई म्हाताऱ्या आई ला घेऊन जिल्ह्याची गाडी पकडणार आहे. कारखान्यानी दिलेल्या इन्शुरन्स वर तो आपल्या आई चे डोळ्यांचे ऑपरेशन करू शकणार आहे.
दादू भिल्ला चा ट्रक, उसाच्या फेऱ्या मारून थकला आहे. तो पेमेंट झाल्यावर दोन दिवस आपल्याच शेतातील काम आटोपून घेणारं आहे. तरं इब्राहिम दादानी या सीझनला आपल्या हॉटेल चे रिनोवेशन करण्याचे मनावर घेतले आहे.
या सिझनला प्रत्येकाकडे काहीतरी प्लॅन आहेच. आपल्या पाठीमागच्या असंख्य पिढ्या दारिद्र्यात जगल्यात आणि त्यातच मेल्या. आपण मात्र नशीबवान म्हणून यांच्यातील प्रत्येकजन संपन्न जगण्याचं स्वप्न आता सत्यात उतरतं आहे म्हणून, त्या कारखान्याचा भोंग्याला आणि चिमनीतून निघणाऱ्या धूराला खुशीने आपल्या शरीरावर भस्मा सारखे चोळून घेतोय. रोमारोमात साठवून घेतोय.
में… में… करत समोरून येणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाने मात्र माझी तंद्री घालवली. एका रांगेत चरणाऱ्या त्या मेंढ्या खुशाल कारखान्याचे कुंपण पार करून आतील चारा खाताना दिसू लागल्या.
गेल्या आठवड्यात हा माळरानं अत्यंत भकास दिसतं होता. आता दोन पाऊस झालेत आणि सर्वत्र हिरवळ दिसायला सुरुवात झालीय.
निर्विकार चेहऱ्याने बँकेचा चौकीदार बसलाय गेटवर शून्यात टक लावून…
कारखान्याच्या वस्तीवर आपले कुठेच काही नाहीं म्हणून तिथेच राहणारी काही बिऱ्हाड…
बरीच मंडळी आता तालुक्यावर दुकानांत काम करतात तरं बाकीची शेती.
वीस-बावीस वर्षांचं एक कोवळ पोरं मला तिथं भेटतं. लहानपणापासुन तो याचं वस्तीवर वाढला आहे. आपला बाप कधी काळी या कारखान्यात काम करायचा असं सर्व म्हणतात म्हणून तो ही म्हणतो. कारण त्याच्या जन्मापासून कारखान्याच्या चिमणीत त्यानी कधी धूर पहिलाच नाहीं. तो जन्मला तसा हा परिसर बंदच!
बाप दीड एकर शेतात राबतो, तालुक्याला आठवडे बाजारात अगरबत्ती ची खाट लावतो. मग स्वतःला ‘ फिटर ‘ का म्हणवून घेतो हे त्याला अजूनही कळत नाहीं. शाळेतील मास्तरांनी विचारलं, की तुझा बाप काय करतो तर तू नेहमी फिटर, असंच उत्तर दे म्हणून सांगत आलाय त्याला इतकी वर्ष! कलेक्टर पेक्षा कारखान्याचा फिटर जास्त भारी…असं मानणाऱ्या बापाची त्याला गम्मत वाटते.
आता त्या मेंढ्या, हॉटेलच्या जागेवर चरतायत. किंबहुना तिथेच त्या जास्त वेळ रेंगाळलेल्या दिसतात. कदाचित त्याचं जागेवर बावीस वर्षांपूर्वी तळल्या जाणाऱ्या इब्राहिम दादाच्या गरम भजीची चव त्यांच्या जिभेला तरं जाणवतं नसावी!
…स्वतःशीच केविलवाणे हसत मी पुढें जात रहातो.
शाळेतील पटांगणावर मोकाट कुत्र्यांची कवायत चालू आहे.
गुरुदत्त मंदिराच्या पायऱ्या मोडकळीस आलेल्या दिसतात. कुणी येथे येऊन प्रार्थना करूच नये असं त्याला वाटतं असावं कदाचित…
वजन काटा, गोडाऊन, पतपेढी चे ऑफिस, चेअरमन, पदाधिकारी बसतात ती इमारत अश्या प्रत्येक ठिकाणी, पिंपळाच्या झाडाची पसरलेली अक्राळविक्राळ मुळं आणि कोळी कीटकांच्या कित्तेक पिढ्या तिथं नांदलेल्याचे भयंकर वास्तव मला नजरेआड करता येत नाही.
नाहीं म्हणायला, तिथं राहणाऱ्या कामगारांची कौलारू बंगली वजा घरे आणि चटई चाळ सुस्थितीत राहिली आहेत. वसाहतीच्या सर्व गरजा भागवणारी एक टपरी देखील आहे मधोमध.
सध्या करोना चा काळ म्हणून माझ्याकडे अविश्वासाने बघणाऱ्या, दोघांकडे मी स्वतःहूनच जातो.
कारखान्याचे ते दिवस, उसाचे हंगाम, इलेक्शनची धामधूम, गणपती चा सोहळा, तिथं होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, मेनस्ट्रीम नाटकांचे होणारे प्रयोग, मळीचा वास आणि
‘ त्या काळी ‘ असणाऱ्या वैभवाच्या दोन गोष्टी करतो.
त्यांना आणि मला ही माहीत असतं आता याचा काही उपयोग नाही. सर्वच कालबाह्य झालंय. तरीही, म्हणतात ना माणसाला भूतकाळात रमायला आवडत. आणि तो वैभवशाली असेल तर निश्चितच!
शेवटी, जुन्या ओळखी, काही आठवणीं आणि बराचसा निरुत्साह घेऊन मी त्यांचा निरोप घेतो.
पटांगणावर, मधोमध महाराजांचा छोटा पुतळा मला दिसतो. पण त्या हि पेक्षा त्यांच्या मागे थोडी दूर असलेली एका जुनाट कार्यालयाची खोली दिसते. कुतूहल म्हणून मी खिडकीत डोकावून बघतो तरं आत प्रचंड धूळ, काही फायली आणि वर चित्रात दिसणारी काही गंज लागलेली पुरस्कार रुपी ढाल आणि कप!
साखर नेली, रोजगार नेला, तालुक्याच्या चेहऱ्यावरचा पुरता आनंद नेला पण, हे पुरस्कार मात्र कुणीही नेले नाहीत. कदाचित, यांची भंगारात देखील जाण्याची किंमत नाहीं असं ‘ त्या नेनाऱ्याना ‘ वाटलं असावं!
मला विंदा करंदीकरांच्या ओळी आठवतात,
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हाथ घ्यावे!
पांझरा कान सहकारी साखर कारखाना हा असाच देणारा काळपुरूष ठरलाय. ज्यानी आपलं सर्वस्व,
‘ त्या नेणाऱ्याना ‘ देऊन टाकलंय.
आता बसलाय एकटा समाधी लावून. निश्चल. निर्विकार.
दुसऱ्या महायुद्धानंतर पुरातत्व खात्यांना अनेक कागदपत्रांचे दस्तावेज सापडले. त्यात नेदरलँड्स या देशातील एका कुमारवयीन मुलीची रोजनिशीही होती. तिचं नाव, ‘ द डायरी ऑफ ॲन फ्रँक’. हिटलर च्या नाझी दहशतवादामुळे दोन वर्ष त्या मुलीला एकाच ठिकाणी लपून रहावं लागलं होतं. त्या काळात ज्यू लोकांचा कसा छळ होत होता या विषयी तिने लिहिलेलं. पुढे जाऊन हे पुस्तक साहित्य विश्वात अजरामर झालं.
इथे, अत्याचार करणारा कुणी ग्लॅमरस हिटलर न्हवता. त्यामुळे त्याला चेहरा न्हवता. अनेक चेहऱ्यांच्या अजगराने मात्र हा कारखाना गिळला. पण त्यांच्या छळाची आणि देशोधडीला लागलेल्या कामगार – शेतकऱ्यांची कुणी डायरी लिहिली नाहीं.
आणि, लिहिली असती तरी ॲन फ्रँक’ प्रमाणे ती साहित्यात अजरामर वैगरे झाली नसती याची देखील खात्री आहे. कारण सरकार कुणाचं हि असलं तरी, माझ्या महाराष्ट्राला शेतकरी आणि कामगारांच्या छळवणूकीची सवयच झाली आहे आता!
महाराष्ट्रच्या ग्रामीण ओद्योगिक क्रांतीचे कधी ऑडिट झालेच तरं कृपया या बंद पडलेल्या कारखान्याचे देखील एखादे छोटेखानी का असेना एक प्रकरण नक्कीच छापा.
त्यात जरूर छापा, शिवाजी राज्याच्या या महाराष्ट्राची आम्हीं भरभरून प्रगती केली. अगदीं उजाड माळराने फुलवली. मुंबई, पुणे, नागपूर आणि अवघा पश्चिम महाराष्ट्रात आम्हीं भरभराटीला आणला. जिल्ह्याजिल्ह्यात संस्थानिकांना लाजवतील असे सहकार सम्राट उभे केलेत. पडतीच्या काळात त्यांना पेकेजेस मंजूर करून त्यांच्या चीमण्यातून धूर काढला. निवडणुका जिंकवून त्यांना या राज्याच्या प्रगतीचे शिलेदार बनवले.
सत्तेचे आणि प्रगतीचे एकाच ठराविक ठिकाणी केंद्रीकरण झाले म्हण्यापेक्षा प्रगती झाली हे महत्वाचे.
शेवटी मतांच आणि निवडून आणलेल्या जागांच काही गणित असतच की नाहीं?
त्यामुळे, जो भाग राखीव, आवाज नसलेला त्याला कशाला हवी पेकेजेस आणि संधी…
तुमच्या भागासाठी, तुम्हीं जगातील कुठलही पाणी वळवून घ्या, आम्हीं बोलणार नाही
तुम्हीं संस्था काढा, त्यांचे व्यवस्थापक किंवा अध्यक्ष व्हा,
आम्हीं बोलणार नाही
तुमच्या चिमण्यातून सोन्याचा धूर निघू दे,
आम्हाला आनंदच आहे.
फक्तं एक करा,
आमच्या सारख्या दुर्लक्षित, अतिमागास, उद्योगविरहित तालुक्यातील अश्या असंख्य गंजलेल्या कारखान्यांना, उद्योगधंद्यांना महाराष्ट्रच्या गतवैभवाचे स्मारक तरी घोषित करा किंवा वर्षानुवर्षे गंज लागत सडणार इथलं लोखंड वितळवून आमच्या शेतकऱ्यांची अवजार तरी बनवून द्या!
दूर राजधानीत बसणाऱ्या आणि एकाच प्रांतांमधून निवडून येणाऱ्या राज्यानों, तुम्हीं आमच्यासाठी इतकं कराच!
(संदर्भ : #कातरवेळचा कोलाहल की कल्ला… काहीसं काहीतरी!)
From Dipak Patil FB Wall Post







