पनवेल (प्रतिनिधी विकास राठोड) – आज (दि.२२) रात्री मुंबई – पुणे जुन्या महामार्गाने प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी खालापूर बाप देव मंदिराजवळून मार्गक्रमण करताना सावकाश वाहने चालवून सावधगिरी बाळगावी.
आमचे पनवेल प्रतिनिधी विकास राठोड या रस्त्याने जात असतांना त्यांना खालापूर बापदेव मंदिराजवळ पाणी साचल्याचे दिसले तसेच रस्त्यावर माती व दगड कोसळलेले दिसते. एक जबाबदार नागरिक म्हणून विकास राठोड यांनी तात्काळ तिथे थांबत येणाऱ्या वाहनांना सावकाश जाण्यास व सावधगिरी बाळगण्यास सांगणे सुरु केले.
दरम्यान हे सगळे करीत असताना त्यांनी नूतन पोलीस अधीक्षक रायगड पोलीस दल भापोसे अशोक दुधे यांना मोबाईलवरून संपर्क करुन, या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. श्री.दुधे यांनीदेखील तात्काळ दखल घेत आयआरबी कंट्रोल रुम यांना संपर्क करुन या प्रकाराबाबत माहिती दिली. मोबाईलवरील संभाषण संपल्यानंतर १० ते १५ मिनिटात आयआरबी कंट्रोल रुमची गाडी जेसीबीसह घटनास्थळावर पोहचली.
जेसीबीने रस्त्यावर पडलेली माती व दगडू बाजूला केले, त्यामुळे रस्त्यावर साचलेले पाणीदेखील कमी झाले. केलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्वरित कारवाई केल्याबद्दल बुलंद पोलीस टाइम्सतर्फे रायगड जिल्हा पोलीस दल व पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांचे मनस्वी अभिनंदन व आभार.







