मुंबई (हितेश मिस्त्री) – भारतीय नौदलाच्या इतिहासात प्रथमच तीन महिला वैमानिक सर्व ऑपरेशनल मिशनसाठी डॉर्नियर विमान उड्डाण करण्यास पूर्णपणे पात्र ठरल्या आहेत. लेफ्टनंट दिव्या शर्मा, लेफ्टनंट शुभांगी स्वरूप आणि लेफ्टनंट शिवांगी या तीन महिला पायलटसनी डॉर्नियर विमानाद्वारे सागरी अभियान नुकतेच पार पाडले. अशी माहिती गुरुवारी संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली.
दिव्या शर्मा या नवी दिल्ली येथील, शुभांगी स्वरूप उत्तर प्रदेशातील तिल्हार येथील आणि शवांगी बिहारच्या मुझफ्फरपूर येथील आहेत. हवाई प्रशिक्षण दलात आणि डीओएफटी कोर्सपूर्वी त्यांना अंशतः नेव्हीबरोबर उड्डाणांचे प्रशिक्षण देण्यात आले. या पासिंग आऊट कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिणी नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ट्रेनिंग) रीअर अॅडमिरल एंटोइन जॉर्ज हे उपस्थित होते.
यावेळी नौदल प्रवक्त्यांनी माहिती दिली की, 27 व्या डॉर्नियर ऑपरेशनल फ्लाइंग ट्रेनिंग (डीओएफटी) कोर्समध्ये भाग घेतलेल्या 6 पायलटमध्ये तिन्ही महिला वैमानिक होत्या. गुरुवारी आयएनएस गरुड येथे झालेल्या पासिंग आऊट कार्यक्रमात त्यांनी संपूर्ण ऑपरेशनल मरीन रेकॉनिसन्स पायलट (एमआर पायलट) म्हणून पदवी प्राप्त केली.







