एकनाथराव खडसे यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश

eknath-khadse

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – माजी मंत्री एकनाथराव खडसे हे आज शुक्रवारी दुपारी दोन वाजता शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी आपल्यासोबत भाजपचे 15 ते 16 आमदार असल्याचा दावा केला असला, तरी ते सध्या आपल्या जिल्ह्यातील मोजक्या समर्थकांसह राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार आहेत. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी भवनात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

 

गेल्या चार वर्षांपासून एकनाथराव खडसे भाजपमध्ये अस्वस्थ होते. सध्या ते त्यांची कन्या रोहिणी खडसे तसेच जळगाव जिल्हा बँकेचे काही संचालक, दूध संघाचे पदाधिकारी व भाजपच्या काही स्थानिक पदाधिकार्‍यांसह पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात भाजपला जनाधार मिळवून देणारा लढवय्या नेता भाजप गमावणार आहे, तर राष्ट्रवादीला त्यांच्यामुळे जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रात पाळेमुळे घट्ट करता येतील, अशी अपेक्षा आहे.

 

एकनाथराव खडसे यांनी आपल्यासोबत भाजपचे 15 ते 16 आमदार असल्याचा दावा केला होता. तर जयंत पाटील यांनी भाजपचे 12 आमदार संपर्कात असल्याचे सांगितले होते. मात्र, खडसेंसोबत सध्या तरी कोणी आमदार प्रवेश करणार नाहीत. जळगावमध्ये त्यांना मानणारे भाजपचे काही आमदार असले, तरी ते भाजप सोडून आपली आमदारकी धोक्यात आणणार नाहीत. भाजपकडूनही कोणताही आमदार खडसेंच्या संपर्कात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

मात्र, खडसेंच्या या निर्णयाने भाजपमध्ये शांतता पसरली आहे. दरम्यान एकनाथराव खडसे यांना भाजपविरोधात ताकद देण्यासाठी त्यांची मंत्रिपदी वर्णी लावली जाणार आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीने मंत्रिमंडळातील सर्व जागा भरल्या आहेत. खडसे यांना कोणाचे तरी खाते काढून द्यावे लागणार आहे. परिणामी, मंत्रिमंडळात फेरबदल अपेक्षित आहे. कोणाचे खाते जाते, याकडे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे लक्ष लागले आहे.

 

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या एक-दोन खात्यांत बदल केला जाणार असल्याचीही चर्चा आहे. शिवसेनेलाही आपल्या मंत्र्यांमध्ये खांदेपालट करायचा आहे. खडसेंच्या पक्ष प्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दांडी मारणार आहेत. अजित पवार यांना ताप आला आहे. अजित पवार यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, ती निगेटिव्ह आली आहे. मात्र, अजित पवार यांनी काही दिवस विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यावरून एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला अजित पवार अनुकूल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुळात अजित पवार हे खडसे यांना पक्षात घेण्यास नाखूश होते. खडसे यांनी विरोधी पक्षनेते असताना शरदचंद्र पवार यांच्यासह अजित पवार यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here