खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – तब्बल सात महिन्याच्या बहुप्रतीक्षेनंतर बुधवारपासून शहरातील आठवडी बाजार ठराविक जागेवर भरला. सकाळपासून आठवडी बाजारात दुकान लावण्यासाठी गर्दी होती. शहरातील व नजीकच्या भागातील दुकानदार जागा पकडण्यासाठी धडपडताना दिसले. ठराविक जागेवर आठवडी बाजार भरणार असल्याने अनेकांना उत्सुकता होती. बाजारामुळे परिसरात रौनक वाढली. पण बाजारात येणारे ग्राहक व दुकानदार कोणतेही नियम पाळताना दिसले नाही. बाजारात सामाजिक अंतराच्या नियमाचा फज्जा उडालेले दिसले.
खुलताबाद येथील आठवडी बाजार शहराच्या मध्यभागी भरतो. बाजाराच्या चारही बाजूला दाट लोकवस्ती आहे. खुलताबाद तालुक्यातील सर्वाधिक मोठा आठवडी बाजार म्हणून ही मंडी प्रचलित आहे. परिसरातील २० ते २५ गावातील नागरिकांचा थेट व्यावसायिक सबंध शहराशी असल्याने आठवडी बाजारात नेहमी गर्दी असते. लॉकडाउनपासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सदर आठवडी बाजार बंद होता. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला लक्षात घेऊन चार महिन्यांपासून सदर आठवडी बाजार बंद होता. बाजार ठराविक जागेवर भरणार असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनामार्फत एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिक व दुकानदारांना देण्यात आली. यामुळे असलेली उत्सुकता बुधवारी रोषात दिसली. बाजारात सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही उपाय स्थानिक प्रशासनाने केलेले दिसले नाही.
सध्या शहरातील लोकसंख्या झपाट्याने विस्तारीकरण झाले आहे. त्या प्रमाणात सदर आठवडी बाजारात दुकाने लावणाऱ्याची संख्या वाढली. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने बाजाराची जागा अपुरी पडते. यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त दुकाने रस्त्यावर भरतात. आठवडी बाजारापासून ते गमंगलपेठपर्यंतच्या अंतरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही कडेला दुकाने लावण्यात येतात. यामुळे या भागात राहणाऱ्या वाहनधारक व नागरिकांना रहदारीचा कमालीचा त्रास सहन करावा लागतो. रस्त्याच्या दुर्तफा दुकाने थाटल्याने या रस्त्यावरून पाय काढणे मुश्किल होते.
आठवडी बाजारात नियमित साफसफाई होताना दिसत नाही. बाजाराच्या आदल्या व दुसऱ्या दिवशी थातूरमातूर सफाई केली जाते. सध्या सर्वत्र कोरोनाचे प्रभाव वाढत आहे. बाजाराच्या परिसरात दाट वस्ती असल्याने या भागातील नागरिक भयभीत झाले आहे.
लॉकडाउन घोषित झाले तेव्हापासून सदर आठवडी बाजार गुलाबशाह कॉलोनी स्थित खुल्या पटांगणावर, ही जागा प्रशस्त असल्याने सामाजिक अंतराचे नियम आपसूक पाळल्या जात होते. त्याबरोबर विस्तारलेल्या वस्तीतील नागरिक सोयीनुसार आपल्या भागातील बाजारात जाऊन खरेदी करायचे.सात महिन्याचा प्रतीक्षेनंतर बाजार भरले खरे पण परिस्थितीचा भान ठेवता होणारे व्यवहार भविष्यात संकट वाढवणारे आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
खुलताबाद आठवडी बाजार गर्दीने फुल्ल असतो. सात महिन्यापासून विविध भागात बाजार भरत असल्याने गर्दीचा प्रश्न उद्भवला नाही. संपूर्ण बाजार एकाच ठिकाणी भरल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसले. कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेले नियम पाळताना दिसले नाही. सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडालेला दिसले. बाजारात असलेले दुकानदार व ग्राहक सैरवैर वावरताना दिसले. स्थानिक प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले.
आठवडी बाजाराच्या चारही बाजूला दाट लोकवस्ती आहे. खुलताबाद येथे अनेक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. म्हणून दाट लोकवस्ती व त्यात वाढल्याने गर्दीने या भागातील नागरिकात कमालीचा रोष पाहावयास मिळाला. आठवडी बाजार भारण्याबाबत काही लोकांची पसंती होती. पण नापसंती दर्शवणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. सुरक्षेचे उपाय न करता बाजार भरवल्याने नगरपरिषद प्रशासनावर अनेकांनी रोष व्यक्त केला. कुणाच्या परवानगीने बाजार भरवण्यात आले याबाबत शासकीय आदेश शोधणाऱ्यांची संख्या अधिक दिसली. बुधवारी दिवसभर याविषयी चर्चा रंगल्या होत्या.
लॉकडाउनच्या काळात भाजीपाला विक्रेत्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. हातचे काम गमावणाऱ्या अनेकांनी आपला मोर्चा भाजीपाला विक्रीकडे वळवला आहे. पारंपरिक भाजी विक्रेते व नव्याने वाढ झालेली भाजी विक्रेता यांच्या संख्येच्या तुलनेत आठवडी बाजारात निम्मी जागा नाही. आठवडी बाजार ठराविक जागेवर भरणार असल्याने दुकानदारांनी जागा पकडण्यासाठी बाजारात धाव घेतली. मिळेल तेथे आपले बस्तान मांडण्यात आले. दरम्यान त्या जागेवर जुन्या दुकानदारांनी आपला दावा ठोकल्याने सकाळपासून बाजारात फ्री स्टाईल सुरु होते.







