मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या खडसेंनी भाजपला रामराम ठोकला असून शुक्रवारी ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनीही भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घटना आहे. एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ खडसे यांनी गेल्या 40 वर्षांपासून भाजप पक्षासाठी मोठं काम केलं आहे. एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात, परंतु मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने एकनाथ खडसेंना भाजपात डावलंलं जात होतं. एकनाथ खडसे यांनी राज्याच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. तसेच फडणवीस सरकारमध्ये त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांनी प्रवेश केला असून या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपला रामराम ठोकल्यानंतर एकनाथ खडसे भावूक होत म्हणाले की, ‘भाजप सरकारमध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केली नव्हती. माझ्या चौकशीची कुणीही मागणी केली नव्हती. कुणीही राजीनामा मागितला नसताना मला राजीनामा द्यायला लावला. माझी तक्रार देवेंद्रजींवर आहे. माझ्यावर त्यांनी विनयभंगाचा खटला दाखल करायला लावला. हे मरणाहून मेल्यासारखं आहे. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण केलं. माझा परिवाराला यामुळं मनस्ताप झाला. माझ्यावर पाळत ठेवली गेली. मंत्री असताना नऊ महिने पाळत ठेवली. मला काही मिळालं किंवा नाही मिळालं याचं दुख नाही, मी माझ्या ताकतीनं ते मिळवलं, असं ते म्हणाले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी राष्ट्रवादीचा एक मंत्री राजीनामा देईल, त्या जागी एकनाथ खडसे मंत्री होती. तर जो मंत्री राजीनामा देईल तो प्रदेशाध्यक्ष होईल, असं म्हटलं जात आहे. दिलीप वळसे-पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांच्यापैकी एखादा मंत्री राजीनामा देणार असल्याची प्राथमिक शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.







