बिहारमध्ये उमेदवाराची गोळ्या घालून हत्या

shree-narayan-sigh

पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीत रक्तरंजित खेळ सुरू झाला आहे. बिहारमधील शिवहरमध्ये शनिवारी जनता दल राष्ट्रवादीचे उमेदवार आणि त्यांच्या एका समर्थकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. उमेदवार आपल्या समर्थकांसह निवडणुकीचा प्रचार करत असताना ही घटना घडली. यावेळी उमेदवाराच्या समर्थकांनी एका मारेकरीला पकडलं. त्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

 

शिवहर विधानसभा मतदारसंघातील जनता दलाचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनारायण सिंह शनिवारी प्रचारासाठी गेले होते. पूरनहिया प्रखंड येथील हाथसर गावाजवळ ते नागरिकांशी संवाद साधत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर तुफान गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबाराने गोंधळ उडाला. छातीत गोळी लागल्यामुळे श्रीनारायण सिंह घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडले.

 

गोळीबारानंतर घटनास्थळावरून पळणाऱ्या दुचाकीस्वारांवर जमावाने हल्ला केला. यात एक आरोपी घटनास्थळीच पकडला गेला. यावेळी जमावाने केलेल्या मारहाणीत त्याचाही जागीच मृत्यू झाला. श्रीनारायण सिंह यांना शिवहर रुग्णालयात उपचारासाठी आणले गेले. तिथून डॉक्टरांनी त्यांना सीतामढी येथे नेण्यास सांगतिलं. पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला आहे. आरोपी हे उमेदवाराचे समर्थक म्हणून गर्दीत घुसले होते आणि संधी मिळताच त्यांनी गोळीबार केला. दुचाकीवरून फरार झालेल्या हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. श्रीनारायण सिंह हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते, असं सांगण्यात येतंय. त्यांच्यावर दोन डझनहून अधिक खटले सुरू होते. श्रीनारायण हे शिवहर जिल्ह्यातील डुमरी कातसरी ब्लॉकमधील नया गावचे रहिवासी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here