नवी मुंबई प्रतिनिधी (विरेंद्र म्हात्रे) – विजयादशमी अर्थात दसरा हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणार्या दसर्याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रूपात ‘सोनं’ एकमेकांना देऊन तो साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाचे सावट व त्यामुळे आलेली मंदी यामुळे अनेकांना दसरा सण मोठ्या जल्लोषात साजरा करणे शक्य झाले नाही.
कोरोना काळामध्ये गरिबीमध्ये वाढ होऊन अनेक कुटुंबे आपली घरदार सोडून कुठेतरी रस्त्याच्या आडोशाला आपल्या मुलाबाळांसोबत स्थिरावली असल्याचे चित्र दिसून येत गोर – गरीब लहान मुलांना देखील दसऱ्यानिमित्त गोडधोड खायला मिळावे व दसरा हसरा व्हावा या उद्देशानेच छत्रपती मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष राजू मरे, नारायण कोळी, मुंबई संघटक प्रमुख चंद्रकांत धडके (मामा) व मुंबई अध्यक्ष प्रकाशभाई कोळी यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र सहचिटणीस केवलदादा महाडिक यांच्या नेतृत्वाने आज दसऱ्यानिमित्त गरीब मुलांना गोडधोड म्हणून ” श्रीखंड ” वाटप केले. 
दसऱ्याला सर्वांच्या घरी श्रीखंड व इतर गोडधोड पदार्थ केले जातात मात्र आजही अनेक गरीब लहान मुले यांना श्रीखंड काय असते हे माहित देखील नाही. त्यामुळे त्यांचाहि दसरा हसरा व आनंदी जावा या हेतूने पनवेलमधील कळंबोली, खांदा कॉलनी येथील वस्तीमधील गरीब लहान मुलांना श्रीखंडाचे वाटप करण्यात आले. यावेळी लहान मुलांनी श्रीखंड घेण्यासाठी बरीच गर्दी केली होती त्यांच्या चेहऱ्यावर आज एक वेगळेच समाधान वाटत होते. राजे प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. यावेळी राजे प्रतिष्ठानचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, ओमकार महाडिक, कैलास रक्ताटे, अशोक चिरके, स्वप्नील बिरारे, तेजस काळे, सुरेश भोईर आदी उपस्थित होते.








