कांदा महाग नाही लोकांचे विचार स्वस्त झालेत – इंजि. कुबेर जाधव

nashik-onion

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – कांदा भाव पाडण्यासाठी केंद्र शासनाने शनिवारी (दि.24) साठवणुकीवर निर्बंध आणताच लासलगाव येथील मुख्य बाजार समितीत लाल कांदा 2,300, तर उन्हाळ कांदा 1,100 रुपयांनी कोसळला. भाव कोसळताच महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे यांच्यासह उपस्थित शेतकर्‍यांनी कांद्यावरील सर्व निर्बंध मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देत आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ लिलाव ठप्प झाले होते.

 

शनिवारी उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त 5800 रुपये, सरासरी 5300 रुपये, तर कमीत कमी 1500 रुपये मिळाला आहे. तर लाल कांद्याला जास्तीत जास्त 4201, सरासरी 3701 तर कमीत कमी 1401 रुपये भाव मिळाले. मोदी सरकारने कांदा निर्यातबंदी, आयातीसाठी प्रोत्साहन, कांदा साठवणुकीवर मर्यादा या कारणांमुळे कांदा भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्राने अवघ्या 25 टनांपर्यंत कांद्याला साठवणीकरिता परवानगी दिली आहे.

 

या पार्श्वभूमीवर बुलंद पोलीस टाइम्सशी बोलताना कांदा उत्पादक संघटनेचे संपर्कप्रमुख इंजि. कुबेर जाधव यांनी सांगितले की, फुकट खाणारी जनता किती दिवस 5 अन 10 रुपये किलोनी शेतकऱ्याचे माल खातील? सर्वांनी 50 रुपयांनी कांदा खायची तयारी करायला हवी . आठवड्याला एक किलो महिन्याचे फक्त चार किलो कांदा . 200 रुपये खर्च करायला काय जाते ? पण लोकांना हॉटेल मध्ये जेवायला , पॉपकॉर्न खायला , ओला उबेर ने फिरायला , ब्रँडेड कपडे शूज गॉगल घालायला , चित्रपट पाहायला पैसा आहे. ब्युटी पार्लर ला जायला पैसे आहेत पण कांदा च फुकट पाहिजे.

 

या लोकांनी आता मानसिकता बदलली पाहिजे. शेतकरी अश्या फुकटखाऊ प्रवृत्ती मुळे मरतो आहे. आपण लहान असताना पाच रुपयाला मिळणारे साबण आत्ता ऐशी रुपयाला मिळतो पण कोणी त्यावर व्हिडिओ नाही बनवला? सगळे मिळून मारताहेत फक्त शेतकऱ्याला, त्याला पण जगू द्या. कधी बसून खर्च मांडा , बघा पूर्ण पगारातील आपण किती खर्च करतो शेतमाल खरेदीवर? उत्तर असेल फक्त पाच टक्के! म्हणजे आपल्याला शेतमाल नसून इतर वस्तू जीवनावश्यक झाल्या आहेत.आत्ता शेतमाल जीवनावश्यक मधून काढायला हवा. जनतेने परवडले तर खावा नाहीतर ब्रँडेड कपडे आणि जपून ठेवलेली सेविंग अन महागाई भत्ता खावा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here