ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नाही तर तो खूनच आहे. या खुनाच्या आरोपाखाली आदित्य ठाकरे गजाआड जाणार, ही केस अजून संपलेली नाही. असा इशारा भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी नामोल्लेख टाळत राणेंचा कुटुंबावर शेण खाऊन गोमुत्राच्या गुळण्या केल्याचं विधान केलं होतं. त्याला आज खासदार नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता नारायण राणे व त्यांच्या दोन्ही मुलांवर सडकून टीका केली होती. आज नारायण राणे यांनी आपल्या स्टाईलने उद्धव ठाकरे व त्यांचे पूत्र आदित्य ठाकरे यांच्यावर प्रहार केला आहे.
राणे म्हणाले की, पोलिसांचा वापर करुन स्वतःच्या मुलाला वाचवणं म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे. सुशांतच्या केसमध्ये स्वतःहूनच काल तुम्ही आपल्या मुलाला क्लीनचीट देऊन टाकली, तुम्हाला लवकरच कळेल. सुशांतला मारलं की त्यानं आत्महत्या केली यामध्ये कोण कोण सामिल होतं. त्याला कशाने मारलं हे सर्व बाहेर येईल. त्यात दिशाच्या मृत्यूचं प्रकरणंही बाहेर येईल. हे काही लपणारं नाही. सीबीआयने या प्रकरणाची केस अद्याप बंद केलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अज्ञानात राहू नये, असे गंभीर आरोप करून राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल केला.
राणे पुढे म्हणाले की, काल उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात मुलगा आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सीबीआय प्रकरणी स्वतःहून क्लीनचीट दिली, आश्चर्य आहे. सीबीआयचा अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही आणि हे म्हणतात आमचे हात स्वच्छ आहेत. सुशांतची आत्महत्या नाही, तर तो खूनच आहे. खूनाचे आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात एक मंत्रीही असेल आणि तो यांचा मुलगा असेल.







