बिजिंग – भारत आणि चीनमध्ये एलएसीवरून तणाव शिगेला पोहोचला आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनने धोकेबाजी करून २० भारतीय सैनिकांना मारले होते. लडाखमध्ये सीमावाद वाढवत असलेल्या चीनने आता रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरावर दावा केला आहे. चीनची सरकारी वृत्तवाहिनी सीजीटीएनचे संपादक शेन सिवई यांनी दावा हा केला आहे. त्यांनी ट्विटकरून या नव्या वादाला तोंड फोडले आहे.
सीजीटीएनचे संपादक शेन सिवई यांच्या म्हणण्यानुसार, रशियाचे व्लादिवोस्तोक शहर हे सन १८६० च्या आधी चीनचा हिस्सा होते. या शहराला पूर्वी हॅशेनवाई या नावाने ओळखले जात होते. रशियाने एका तहानुसार हे शहर चीनकडून हिसकावून घेतले, असे मत व्यक्त केले आहे.
चीनमध्ये सर्व माध्यम संस्थांवर सरकारी नियंत्रण आहे. एकप्रकारे या माध्यम संस्था सरकारीच असून तेथील संपादक स्तरावरील कर्मचारी हे चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या आदेशानुसारच आपले मत व्यक्त करत असतात. चीनी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले राजकीय मत हे तेथील सरकारची विचारसरणी प्रतिबिंबित करते. त्यामुळे ‘सीजीएनटी’ या वृत्तवाहिनीच्या संपादक शेन सिवई यांनी ट्विट करून व्यक्त केलेले मत हे महत्वाचे ठरते.







