जळगाव (संपादक सुनिल पाटील) – अनेक दिवसांपासून भाजपावर नाराज असलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर एकूणच उत्तर महाराष्ट्रातील भाजपाला उतरती कळा लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर झालेल्या किंवा होणार्य डॅमेज कंट्रोलची चाचपणी करण्यासाठी भाजपाच्या जळगाव जिल्हा कोअर कमिटीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला.
भाजपाच्या जळगाव जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीसाठी माजी मंत्री गिरीश महाजन, प्रांत संघटन मंत्री विजय पुराणिक, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील आदी नेते उपस्थित होते. असे असले तरी देखील एकनाथराव खडसे यांच्या सुनबाई आणि भाजपच्या रावेर येथील खासदार रक्षाताई खडसे यांनी या बैठकीला गैरहजर होत्या.
दरम्यान, रक्षाताई खडसे यांच्या गैरहजेरीबाबत भाजपा आमदार गिरीश महाजन यांना विचारले असता ते म्हणाले, रक्षाताई खडसे काल रात्री पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेल्या आहेत. त्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ नेत्यांना पूर्वकल्पना दिली असून, पक्षाची परवानगी घेऊनच त्या दिल्लीला गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीसंदर्भात तर्कवितर्क लढवणे चुकीचे असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, नाथाभाऊंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी भाजपमध्येच राहणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रवेश केल्यानंतर नाथाभाऊ त्यांच्या मूळगावी कोथळी येथे आल्यानंतर रक्षाताई खडसे यांनी त्यांचे स्वागत केले होते.







