खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालुक्यातील नंद्राबाद पेस सेंटर येथे कर्माचाऱ्यासाठी कोविड-19 रॅपिड अँटीजन तपासणी शिबीर घेण्यात आले या वेळी पेस प्रशिक्षण केंद्रातील 40 कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी करण्यात आली. सर्व कर्मचारी यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. तपासणी करण्यापूर्वी प्रत्येकाच्या मनात धाक धुक होती परंतु सर्वच अहवाल हा निगेटिव्ह आल्याने सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.मंगळवार दि. 27 रोजी खुलताबाद तालुका आरोग्य विभाग यांच्या वतीने वेरूळ येथील वैद्यकीय अधिकारी बलराज पांडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना या आजाराची तपासणी तात्काळ करण्यासाठी कोविड -19 रॅपिड अँटीजन तपासणी शिबीर घेण्यात आले.
खुलताबाद तालुक्यातील हे प्रशिक्षण केंद्र मार्च 2020 लॉक डाऊन सुरू झाल्या पासून बंद होते, तेव्हापासून ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षणार्थी युवक व युवतींना प्रशिक्षण देण्यात येत होते. परंतु आता शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून दि. 1 नोव्हेंबर पासून प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आहे. त्या मुळे प्रशिक्षण देणे सुरू होण्यापूर्वी येथील सर्व कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी करून घेण्यात आली.
तसेच येथे प्रशिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी कोविड तपासणी सक्तीची करण्यात आली आहे.यासाठी विद्यार्थ्यांना वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी सुविधा उपलब्ध असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ पांडवे यांनी सांगितले.
या वेळी वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक के. एफ. राठोड, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीमती पी. आर. बनसोड, आरोग्य सेवक कानबा झाटे, आशा सोनवणे, कनिष्ठ सहाय्यक शेख कदीर, वाहनचालक सुधाकर बोडखे यांच्यासह केंद्र प्रमुख दामोदर सर, अमोल जाधव, श्रीहरी जाधव, विजय केदारे यांनी परिश्रम घेतले.







