खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसार औरंगाबाद जिल्हयासाठी (पोलिस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळुन ) 30 ऑक्टोबर रोजी साजरा करावयाच्या ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी)सणा संदर्भात काय करावे आणि काय करु नये याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सूचना निर्गमित केल्या असून नागरिकांनी त्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.
कोवीड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुर्नवसन, आरोग्य,पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करावे. कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे उल्लंघन करण्यात येऊ नये.
या वर्षी इतर धार्मिक सणांप्रमाणे ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी)देखील आपापल्या घरात राहुनच साजरा करण्यात यावा. शासनाकडून सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याने पोलीस प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी)ची मिरवणूक काढण्यात येवू नये. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे.
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारे निर्बंधांचे उल्लंघन करु नये. शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन हा सण घरी राहून साधेपणाने साजरा करावा. सोसायटीमधील नागरिकांनी एकत्रित जमून सण साजरा करु नये सबील( पाणपोई )बांधण्या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था यांची पुर्व परवानगी घ्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पुर्वपरवानगी शिवाय सबील(पाणपोई )ची स्थापना करु नये.







