अर्धवट रस्ता वाहन धारकांसाठी बनला धोकादायक.
खुलताबाद ( प्रतिनिधी सलमान खान) – शासनाने म्हैसमाळ रस्त्यांसाठी ४० कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असला तरीही प्रत्यक्षात भरीव निधी दिला जात नाही, त्यामुळे म्हैसमाळ रस्त्याचे काम अर्धवट पडले आहे. या रस्त्याचे काम बंद असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पुरेसा निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी म्हैसमाळ येथील ग्रामस्थांनी केली आहे.काम सुरू होऊन एक दीड वर्षे उलटून गेले तरी, निधीअभावी पुढील काम सुरू केले जात नसल्याने वाहनचालकांसह म्हैसमाळ येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. रस्ता करायचा नव्हता तर, चांगला रस्ता उखडून ठेवला कशाला, असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पर्यटन विकास प्राधिकरण अंतर्गत म्हैसमाळ रस्त्याचे काम केवळ निधी उपलब्ध नसल्याने अर्धवट अवस्थेत अपूर्ण पडले आहे. तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांनी विशेष प्रयत्न करत म्हैसमाळच्या पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने या रस्त्याच्या कामासाठी ४० कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. मात्र राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेला निधीच वितरीत केला जात नसल्याने हे रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे. रस्त्याचे काम अर्धवट असल्याने वाहनांना हा रस्ता धोकादायक बनला आहे. दहा मिनिटांचा हा रस्ता पार करण्यासाठी वाहनांना तासभर लागत आहे.
म्हैसमाळ हे मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. श्री गिरीजादेवी, बालाजी मंदिर येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. एटीआर कंपनीने खुलताबाद ते म्हैसमाळ रस्त्याचे काम हाती घेतले होते. एटीआर कंपनीचे केलेल्या कामांची बिले थकल्याने १५ जुलै २०१९ पासून रस्त्याचे काम बंद होते. ऑगस्टमध्ये या रस्त्यासाठी तीन लाख दोन हजार रुपयांचा निधी दिला गेला आहे. यामुळे कंत्राटदार हतबल झाले आहे. 
कंत्राटदारांना इतक्या कमी निधीतून ४० कोटी ३२ लाख रुपयांचे काम कसे पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हैसमाळ रस्त्यासाठी आणलेली मशिनरी हलविण्याच्या मनस्थितीत कंत्राटदार आहे. पावसामुळे रस्त्यावरील खडी वाहून गेल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. दररोज छोटेमोठे अपघात होत आहेत. एखादा मोठा अपघात होऊन मोठी दुर्घटना घडण्याची वाट शासन पाहत आहे का ? असा प्रश्न म्हैसमाळ येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे म्हैसमाळ, लामनगाव , शिरसमाळ, टाकळी राजाराय, धामणगाव, लोणी, बोडखा, गंद्धेश्वर आदी गावांना जाणाऱ्या येणाऱ्या ग्रामस्थांना जीव मुठीत धरून वाहने चालवत प्रवास करावा लागतो. या रस्त्याच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देऊन जलदगतीने हे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या म्हैसमाळची ख्याती सर्वदूर आहे. निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. सध्या पर्यटन हंगाम असला तरी म्हैसमाळला शैक्षणिक सहली आणि पर्यटकांची गर्दी घटली आहे. अत्यंत खडतर रस्ता पर्यटकांची गर्दी घटण्याचे कारण आहे. खुलताबाद ते म्हैसमाळ रस्ता खचला आहे. या रस्त्याने वाहन चालवणे कठीण झाल्यामुळे पर्यटकांनी थंड हवेच्या ठिकाणाकडे पाठ फिरवली आहे. वेरूळ, खुलताबादला आलेले पर्यटक आवर्जून म्हैसमाळला भेट देतात. बाहेरच्या जिल्ह्यातील व राज्यातील पर्यटकांची यात सर्वाधिक संख्या आहे. या रस्त्याने प्रवास करणे पर्यटकांसाठी शिक्षा ठरली आहे. विशेषतः दुचाकीचालक पर्यटकांचे अंग ठणकल्याशिवाय राहत नाही. या रस्त्यामुळे पर्यटक व भाविक त्रस्त झाले आहेत.







