खासदार इम्तियाज जलील यांच्यातर्फे मोफत पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण

imtiyaz-jalil

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – महाराष्ट्र पोलीस दलात मेगाभरती होणार असल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरीब, होतकरु व कष्टकऱ्यांच्या कुटुंबातील मुले व मुलींची भरती व्हावी यासाठी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी इच्छुक उमेदवारांना पोलीस दलात भरती होण्यासाठी पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण तज्ञांमार्फत मोफत देण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे.

 

सध्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांचे संख्याबळ पुरेसं नाही, तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखत असतांना उपलब्ध असलेल्या पोलिसांवर ताण येत आहे या पाश्र्वभुमीवर राज्य सरकारने पोलिस भरतीबाबत निर्णय घेतला. सन २०२०-२०२१ यावर्षाकरिता १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार असल्याने शहरी व ग्रामीण भागातील अनेक युवकांना पोलिस दलात सहभागी होता येणार आहे.

 

पोलीस भरती दरम्यान अनेक इच्छुक उमेदवार शासनस्तरावर अर्ज सादर करतात परंतु योग्य ते मार्गदर्शन व प्रशिक्षण नसल्याने तसेच मैदानी चाचण्यांचे सराव नसल्याने शारीरिक पात्रता असतांना सुध्दा उमेदवार निवडी पासुन वंचित राहतात. त्यामुळे उमदेवारांना जणु त्यांचे संपुर्ण आयुष्य उध्द्वस्त झाल्याचे जाणवते. पोलीस भरती दरम्यान उमेदवारांची अडचण लक्षात घेता पोलीस भरतीपुर्व उमेदवारांना मोफत मैदानी शारिरीक चाचण्यांचे प्रशिक्षण, सामान्य ज्ञान व इतर लेखी परिक्षेचे अभ्यासक्रम पुर्ण करुन सराव परिक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

 

औरंगाबाद जिल्ह्यातील अधिकाधिक गरीब, होतकरु उमेदवारांची पोलीस दलात निवड होण्याच्या दृष्टीने कोरोनाच्या परिस्थितीत राज्य शासनाच्या नियमानुसार सामान्य ज्ञान आणि शारीरिक चाचण्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामध्ये मराठी, गणित, बुध्दिमत्ता, सामान्य अध्ययन व चालू घडामोडी तसेच मैदानी सरावामध्ये धावणे (१०० व १६०० मी.), गोळाफेक व इतर चाचण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना एकूण दोन महिने दररोज चार तासांचे वर्ग व मैदानी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त इच्छुक उमदेवारांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

 

पोलीस दलातील उच्च अधिकारी मार्गदर्शन करणार
पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणा दरम्यान पोलीस दलातील उच्च अधिकारी उमदेवारांना मैदानी शारिरीक चाचण्यांचे प्रशिक्षण, सामान्य ज्ञान व इतर लेखी परिक्षेचे अभ्यासक्रम पुर्ण कसा करावा याबाबत योग्य ते मार्गदर्शन करणार आहे. तसेच मैदानी चाचण्या व लेखी परिक्षेत जास्तीत जास्त गुणांनी उत्तीर्ण होण्याकरिता सरावादरम्यान अनेक टिप्स सुध्दा देणार आहे.

 

पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण करिता निवड प्रक्रिया
पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण घेण्याकरिता नोंदणी केलेल्या इच्छुक उमेदवारांची निवड करण्यासाठी लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे. तद्नंतर परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तज्ञ प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. लेखी परिक्षेसाठी नोंदणी करण्या करिता उमेदवारांना पुढील कागदपत्रे, अटी व शर्तीची पुर्तता करावी लागणार आहे. त्यामध्ये प्रशिक्षणार्थी उमदेवार शारिरीकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा, उमेदवार हा १८ ते २८ वयोगटातील असावा, पोलीस भरतीची शारीरिक पात्रता असणे आवश्यक म्हणजे उमेदवारांची उंची पुरुष १६५ से.मी. व महिला १५५ से.मी., छाती पुरुष ७९ से.मी. फुगवून ५ से.मी. वाढवावी, उमेदवार इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावा.

पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण करिता नोंदणी प्रक्रिया
पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणकरिता उमेदवारांनी नोंदणीसाठी येतांना सोबत पासपोर्ट सोईज फोटो, शैक्षणिक अर्हता गुणपत्रक, आधार कार्ड इ. कागदपत्रांच्या छायांकित प्रती अर्जासोबत आणणे आवश्यक राहील. दिनांक 4 ते 6 नोव्हेंबर 2020 रोजी, सकाळी 11.00 ते 3.00 वाजेदरम्यान दुआ बँक, खासदार कार्यालय, दिल्ली गेट जवळ, औरंगाबाद येथे नोंदणी करावी असे आवाहन खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी शेख अझहर बाबर – 9823941123, शंकर महाबले – 9158590009, सय्यद मझहर – 9021249339, प्रित संगले, सय्यद फैसल, अशरफ पठाण, कृतिकेष आडे, सय्यद रेहानोद्दीन, यशश्री देशमुख, प्रणिता चींचोलीकर, मोहम्मद साबेर यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here