भोपाळ – निवडणुकीच्या तोंडावर या पक्षातून त्या पक्षात गेलेल्या उमेदवारांचा नेहमीच गोधळ उडत असतो. सातत्याने बरीच वर्षे एकाच पक्षाचा प्रचार केल्यानंतर अचानक दुसऱ्या पक्षाचा प्रचार करण्याची वेळ येते तेव्हा गोंधळ उडण्याचीच शक्यता अधिक असते. असेच काहीसे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत झाले. काँग्रेसला रामराम ठोकत भाजपच्या गोटात शिरलेले ज्योतिरादित्य सिंधिया हेदेखील आपल्या पक्षासाठी जोर लावत मैदानात उतरलेले आहेत. मात्र, एका जनसभेत ज्योतिरादित्य सिंधिया आपला पक्षच विसरले… आणि त्यांनी चक्क काँग्रेससाठीच जनतेकडे मतांची याचना केली. स्टेजवर उपस्थित असलेल्या भाजप नेते मात्र ज्योतिरादित्य यांच्याकडे केवळ पाहातच राहिले.
मध्य प्रदेश विधानसभेच्या २८ जागांवर येत्या रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी नेत्यांची लगबग सुरू आहे. भरगच्च जाहीर सभांमध्ये आपल्याच पक्षाला समर्थन देण्यासाठी नेते मतदारांना आवाहन करताना दिसत आहेत. सर्वच नेत्यांनी आपली ताकद पणाला लावलीय.
शनिवारी डबरामध्ये भाजप उमेदवार इमरती देवी यांच्या समर्थनासाठी एक सभा आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही या सभेला हजेरी लावली. याच दरम्यान हा प्रसंग घडला. ‘३ तारखेला पंजेवाला बटण दाबलं जाईल’ असं म्हणताना ज्योतिरादित्य सिंधिया या व्हिडिओत दिसत आहेत.
सिंधिया जी,
मध्यप्रदेश की जनता विश्वास दिलाती है कि तीन तारीख़ को हाथ के पंजे वाला बटन ही दबेगा। pic.twitter.com/dGJWGxdXad— MP Congress (@INCMP) October 31, 2020
‘हात उंचावून शिवराज सिंह आणि आम्हाला हा विश्वास द्या, माझी डबराची जनता, माझी शानदार आणि जानदार डबराची जनता… ३ तारखेला हाताचा पंजा असलेलं बटण दाबलं जाईल’… असं म्हणत असतानाच ज्योतिरादित्य सिंधिया यांना आपल्या मोठ्या चुकीची जाणीव झाली. मग लगेचच त्यांनी आपलीच जीभ चावत, ‘कमळाचे फूल असलेलं बटन दाबणार आणि हाताचा पंजाच्या बटणाला बोरिया बिस्तर बांधून आम्ही इथून रवाना करणार’ असं म्हणत वेळ सावरून नेली.







