सातारा (प्रतिनिधी शरद मोरे) – तालुक्यातील काळोशी येथील सूरज लक्ष्मण लामजे (वय २८) या जवानाचा लडाख (जम्मू काश्मीर) येथे अपघाती मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास घडली. सुरजच्या मृत्यूने परळी खोऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सूरज लक्ष्मण लामजे २०१४ साली मुंबई आयोजित लष्कराच्या भरतीत भरती झाला होता. त्यानंतर बंगलोर येथे त्याचे ट्रेनिंग झाले. सध्या तो लडाख येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत होता.
सूरज हा ड्रायव्हर असल्याने शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास सैन्य दलातील साहित्य घेऊन जात असताना त्यांची गाडी दरीत कोसळली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. सूरज हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने काळोशी खोऱ्यात परिचित होता. त्याच्या जाण्याने परळी खोऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.







