पुणे (नारायण शेळके) – माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने (वय ४७) यांचे कोरोनामुळे निधन झाले

आहे. आज (शनिवारी) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
25 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरु होते. मात्र, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना धान्य वाटप करताना त्यांना कोरोना संसर्ग झाला होता.
पुण्यासह जिल्ह्यातील इतर भागात सातत्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. नगरसेवक दत्ता साने यांना 25 जूनला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. सुरुवातीला त्यांना काही प्रमाणात कोरोनाची लक्षणं आढळली. मात्र, नंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला. त्यातच आज ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दत्ता साने यांच्या मागे आई, पत्नी हर्षदा, १९ वर्षीय मुलगा यश, १६ वर्षीय कन्या तसेच दोन मोठे भाऊ असा मोठा परिवार आहे. चिखली परिसरातून तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाऊन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली होती. अन्नधान्यांचे वाटप करताना त्यांचा नागरिकांशी संबंध आला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ‘दत्ताकाका’ या नावाने चिखली परिसरातच नव्हे तर संपूर्ण शहरात ते परिचित होते.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (3 जुलै) 1199 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 26 हजार 143 वर पोहचली आहे. काल दिवसभरात उपचारानंतर बरे झालेल्या 792 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 16 हजार 156 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात काल दिवसभरात 16 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आतापर्यंत झालेल्या मृत्यूंचा आकडा 822 वर पोहचला आहे.
पुणे मनपा हद्दीत शुक्रवारी दिवसभरात 807 नवीन बाधित रुग्ण आढळले. आतापर्यंत पुणे मनपा क्षेत्रात एकूण 19, 849 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 685 एवढी झाली. काल 619 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 12,290 जण कोरोनामुक्त झाले. सध्या पुण्यात 6874 सक्रिय रुग्ण आहेत, तर 389 गंभीर असून 59 व्हेंटिलेटर आहेत.







