शहादा (विजय पाटील) – जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूहा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे राज्यशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंधक कायदा १९८७ दिनांक १३/०३/२०२० पासून लागू करुन खंड २,३ व ४ मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे.
शहादा तालुक्यात दि. ०३ जुलै रोजी ८ व्यक्तींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यातील ७ शहादा शहरातील नगरपालिका हद्दीतील असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहादा शहर व नजिकच्या लोणखेडा ग्रामपंचायत क्षेत्र कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून दि. ५ जुलै रोजी मध्यरात्रीपासून ८ जुलै मध्यरात्रीपर्यंत वैद्यकिय सुविधा, मेडीकल स्टोअर्स, दुध केंद्र, शासकीय कार्यालय व शासकीय धान्य गोडाऊन वगळता सर्व प्रकारची आस्थापना – दुकाने बंद करणेबाबत आदेश उपविभागीय दंडाधिकारी चेतन गिरासे यांनी जारी केला आहे.
हा आदेश संपूर्ण शहादा शहर व नजिकच्या लोणखेडा ग्रामपंचायत क्षेत्रास लागू राहणार असून, येथील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भा.दं.संहिता १९६० चे कलम १८८ नुसार अपराध मानला जाईल.







