इस्लामाबाद- पाकिस्तानमधील शेखुपुरा येथे बस आणि रेल्वेमध्ये झालेल्या भीषण अपघातात 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. मरणाऱ्यांमध्ये अधिकतर शीख भाविक होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही अपघात नानकाना साहब जवळ फाटक नसलेल्या क्रॉसिंगवर झाला आहे. यात कमीतकमी 19 शीख यात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. यात महिला आणि लहान मुलाचाही समावेश आहे. मिनी बसमध्ये एकूण 26 प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती कळत आहे.
शुक्रवारी प्रवाशांनी भरलेली एक बस आणि शाह हुसैन एक्सप्रेस रेल्वे यांच्यामध्ये जोराची टक्कर झाली. यात कमीतकमी 19 शीख यात्रेकरु मेल्याची माहिती आहे. तर अनेकजण जखमी झाले असल्याचे कळत आहे. जखमींना लाहोरमधील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी दोषी असलेल्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. पाकिस्तानमधील शिख यात्रेकरुंच्या दुर्घेटनेमुळे मला दु:ख झालं आहे. या दु:खाच्या क्षणी माझे विचार त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत आहेत. जे यात्रेकरु जखमी झाले आहेत, ते लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो, असं मोदी म्हणाले आहेत.







