जुनी पेंशन हक्क संघटन, जिल्हा वर्धा ने दिले वित्त व लेखा अधिकारी प्राथमिक यांना निवेदन
वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – आर्थिक वर्ष 2019- 20 च्या वेतनात DCPS रक्कम कपात होऊनही वर्ष अखेरीस प्राप्त विवरण पत्रात नोंदविल्या नसल्याने महाराष्ट्र जुनी पेंशन हक्क संघटने या संदर्भात मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांचे कक्षात भेट घेऊन निवेदन सादर केले.
2019 – 20 च्या अप्राप्त चलान प्राप्त करून घेत नवीन विवरण पत्र तयार करण्याचे त्वरित आदेश अधिकारी महोदय यांनी संबंधित लिपिकास दिले. त्याचबरोबर 2019 मध्ये रोखीने प्राप्त सातव्या वेतन आयोगाच्या फरकातील पहिल्या टप्प्याच्या DCPS फरकातील रक्कम कर्मचाऱ्यांच्या DCPS खात्यात जमा व्हायला हवे होते, परंतु कारंजा पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांच्या खात्यात सदर रक्कम जमा झाली नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. 
या संबंधी विचारणा केली असता कारंजा पंचायत समिती वगळता इतर पंचायत समितीद्वारे वेतन आयोग फरकातील कपात रकमेचे शेड्युल व चलान प्राप्त झाले परंतु कारंजा पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांच्या कपातीसंबंधीत चलान अप्राप्त असल्याचे संबंधितांनी सांगितले असता सदर प्रकरणी शिक्षण विभाग पंचायत संमती कारंजाशी पत्रव्यवहार करून सदर त्रुटी दूर करण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. 2 नोव्हेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या DCPS खात्यात 14% नुसार शासन अंशदान जमा करण्यात यावे असा निर्णय असतांना 2019 – 20 मध्ये 10% दरानेच शासन अंशदान जमा करण्यात आले.या संबंधित त्रुटी लक्षात आणून दिली असता शालार्थ वेतन प्रणालीत ग्रामविकास विभाग व शालेय शिक्षण विभाग स्तरावरून तशी तरतूद अद्यापही उपलब्ध नसल्याचे स्पष्टीकरण संबंधित वरिष्ठ लिपिक श्री. फुटाणे यांनी दिले.
या वेळी माजी शिक्षणाधिकारी धनराजी तेलंग यांनी समस्याची उकल करून त्यादृष्टीने वित्त व लेखा अधिकारी यांच्याशी तपशीलवार चर्चा घडवून आणली. सदर निवेदनाची एक प्रत जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. सरिताताई गाखरे यांची भेट घेऊन त्यांना सादर करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे राज्य समन्वयक सुशील गायकवाड, वर्धा चे जिल्हाध्यक्ष प्रफुल कांबळे, जिल्हा सचिव प्रमोद खोडे, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत पारधी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज पालिवाल,शरद भांगे,सचिन खडसे आदी सदस्य उपस्थित होते.







