महाराष्ट्र सरकारच्या ‘आपले सरकार’ पोर्टल च्या माध्यमातून आरोग्य विभागाकडे आरोग्य सेवक नियुक्ती मागणी
मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – जिल्हा पुणे, तालुका आंबेगाव, अवसरी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका, आरोग्य सेवक नियुक्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत सा. टाव्हरे यांनी केली आहे. अवसरी बुद्रुक गावामध्ये पाच वर्षां पासुन आरोग्य सेवक नाही. तसेच दोन वर्षांपासुन आरोग्य सेविकाही नाही. अवसरी बुद्रुक या गावाची लोकसंख्या अंदाजे ७ हजार च्या आसपास आहे.
तसेच बाजूला दोन गावे गावडेवाडी, टाव्हरेवाडी आहेत ही तीन गावे मिळून सध्या एकच आरोग्य सेविका आहे. गावडेवाडी येथे नियुक्त या एकाच आरोग्य सेविकेला इतर गावांचा अतिरिक्त पदभार दिल्यामुळे या एकाच आरोग्य सेविकेला इतर गावांनाही जावे लागते. त्यामुळे वेळेवर येथे आरोग्यसेवा देण्यासाठी कुणी ही उपलब्ध नसते. याचा परिणाम तिन्ही गावातील रुग्णांना आरोग्य सेवा देण्यावर होत आहे. रूग्णांना योग्य प्रकारे आरोग्य सेवा भेटत नाही.
या तिन्ही गावातील वयोवृध्द, महिला आणि बालक यांची संख्या लक्षणीय आहे. त्यातच सध्या कोरोना कोविड – १९ ने थैमान घातले असल्याने आरोग्य सेवा लवकर मिळण्यासाठी अवसरी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवक पदाची नियुक्ती करावी ही मागणी हनुमंत टाव्हरे यांनी महाराष्ट्र सरकारच्या ‘आपले सरकार’ पोर्टल च्या माध्यमातून आरोग्य विभागाकडे केली आहे.







