पुणे (नारायण शेळके) – कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून अनेकांचा रोजगार बंद आहे. आजच्या घडीला सामान्य माणसाला
रोजचा खर्च भागवणे मुश्कील झाले आहे. त्यातच लाईट बिल व पाणी बिल आल्याने जनसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. यापरिस्थितीवर मात करण्यासाठी बहुजन परिवर्तन पार्टी प्र. महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्यावतीने दि. ३ व ४ जुलैला उपोषण करण्यात आले. या उपोषणाला यश आले असून, लॉकडाऊनच्या काळातील लाईटबिल व पाणी बिल माफ करण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेचे लाईटबिल व पाणी बिल माफ करावे यासाठी बहुजन परिवर्तन पार्टी प्र. महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीचे भारत तुकाराम मोरे व पदाधिकारी आमरण उपोषणास बसले होते. उपोषणाला ४० तास झाल्यानंतर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या असल्याबाबतचा मुख्यमंत्री कार्यालयाचा मेल बहुजन परिवर्तन पार्टी प्र. महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांना मिळाला आहे. मागण्या मान्य करुन गोरगरीब जनसामान्यांना न्याय मिळवून जिल्याबद्दल बहुजन परिवर्तन पार्टी प्र. महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीने सरकारचे आभार मानले आहे. तसेच लॉकडाउनच्या काळात विनाकारण बाहेर न निघता घरातच राहून आपल्या कुटुंबाची काळजी घ्या व सुरक्षित रहा, असे आवाहन ही बहुजन परिवर्तन पार्टी प्र. महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्यावतीने संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांनी केले आहे.







